Join us

Weather Report : खान्देश, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 8:02 PM

हे अवकाळीचे वातावरण अजून तीन दिवस राहणार असल्याचा अंदाज जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी विदर्भातील पाच सहा जिल्ह्यात गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे वित्तहानीसह शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता हे अवकाळीचे वातावरण अजून तीन दिवस राहणार असल्याचा अंदाज जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेल्या रब्बी पिकासह जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

खान्देश, मराठवाडा व विदर्भातील एकूण २२ जिल्ह्यात विशेषतः जळगांव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली, नांदेड, परभणी, हिंगोली, वर्धा ह्या जिल्ह्यात पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार ते शनिवार दि.११ ते १३ एप्रिलपर्यंत मध्यम अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.                  तसेच मध्य महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यात  ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असु शकते. मुंबईसह कोकणात मात्र वातावरण कोरडे राहणार असुन दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दिड डिग्रीने अधिक जाणवेल. रविवार दि.१४ एप्रिल पासून अवकाळीची तीव्रता काहीशी कमी होईल. 

पुढील दोन दिवस 

पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाड्यात पाऊस व गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवेची चक्रीय स्थिती सध्या महाराष्ट्राच्या मध्य भागावर आहे. कोकण, गोव्यात पाच दिवस हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्रात नगर, सांगली व सोलापूर येथे ११ व १२ एप्रिल रोजी आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाटही होईल. विदर्भात पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट होईल. 

टॅग्स :हवामानशेतीनाशिकअकोलागारपीट