Join us

Jayakwadi Dam:जायकवाडी गाळात; साठवण क्षमता १०२ वरून ८७ टीएमसीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 9:59 AM

'मेरी'च्या अहवालावर कारवाई होईना

दादासाहेब गलांडे

पैठण येथील जायकवाडी धरणात गाळासह वाळू मोठ्या प्रमाणात आल्याने धरणाचीपाणी साठवण क्षमता १०२ टीएमसीवरून ८७ टीएमसीवर आल्याचा अहवाल नाशिकच्या 'मेरी' या संस्थेने २०१२ मध्ये दिला असताना या अहवालावर १२ वर्षांमध्ये काहीही कारवाई झाली नसल्याची बाब समोर आली आहे.

जायकवाडी धरणाचे काम १९६५ मध्ये सुरू झाले. १९७६ मध्ये पूर्ण झाल्यानंतर येथे पाणी साठवण्यास सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, पैठण, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासे तालुक्यातील मिळून ११८ गावांमधील ३४ हजार १०५ हेक्टर क्षेत्रात धरणाचा परिसर आहे. धरणाचा आकार हा बशीप्रमाणे आहे. या धरणाचा नाशिक येथील 'मेरी' (महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) या राज्य शासनाच्या संस्थेने रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून २०१२ मध्ये सर्व्हे केला होता. या सव्र्व्हेत धरणात १५ टीएमसी गाळ असल्याने धरणाची साठवण क्षमता १०२ टीएमसीवरून ८७ टीएमसीवर आल्याची बाब समोर आली होती. हा अहवाल 'मेरी' संस्थेने शासनाला सादर केला होता. त्यानुसार या धरणाची साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी शासन स्तरावरून पावले उचलणे आवश्यक असताना काहीही कारवाई झालेली नाही. 'मेरी'च्या सव्र्व्हेनंतर धरणातील गाळ १५ टीएमसीवरून आणखी वाढला आहे.

गाळ शेतकऱ्यांना द्यावा दरवर्षी पाण्यासोबत विविध घटक वाहत धरणात येतात. त्यामुळे धरणात आज रोजी ३० टक्के गाळ, वाळू जमा झाली असेल. धरणातील गाळ शेतकऱ्यांना द्यावा, तसेच वाळूचीही विक्री करावी. जेणेकरून शासनाला महसूल मिळेल आणि धरणाची साठवण क्षमता पूर्वीप्रमाणे वाढेल, असे मत पर्यावरण अभ्यासक प्रा. संतोष गव्हाणे यांनी व्यक्त केले.

जलसंपदा विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना विनामूल्य गाळ दिल्यास शेकडो शेतकरी आपल्या शेतात धरणातील गाळ स्वखर्चाने नेतील. या गाळामुळे शेतकऱ्यांची नापीक जमीन सुपीक बनेल. तसेच जमिनीचा पोत सुधारून उत्पन्नात वाढ होईल.-दीपक मोरे, शेतकरी

पक्षी अभयारण्यामुळे निर्णय शासन स्तरावरच

१० ऑक्टोबर १९८६ रोजी जायकवाडी जलाशयाचे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे धरणातील गाळ उपसण्याचा निर्णय शासन स्तरावरूनच निर्णय घ्यावा लागेल, असे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.

धरणात फक्त ९.६३% पाणीसाठा

सध्या धरणात फक्त ९.६३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातील गाळ काढणे सोपे आहे; परंतु शासकीय पातळीवरून अद्यापही याबाबत काहीच हालचाल दिसून येत नाही.

टॅग्स :जायकवाडी धरणधरणपाणी