Join us

मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट तर इथे मेघगर्जनेचा पाऊस, वाचा सविस्तर अंदाज

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 26, 2024 2:36 PM

मराठवाड्यातील या जिल्ह्यांना उष्णतेपासून मिळणार दिलासा, उर्वरित भागात तापमान चढेच राहणार

राज्यात तापमानाच्या कडाक्याने नागरिक हैराण झाले असून आज परभणी नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. 

बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर पोहोचला असून आज परभणीत 45.2 अंश नांदेड जिल्ह्यात 43.8 तर हिंगोली मध्ये 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. 

आज नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय धाराशिव लातूर जिल्ह्यातही तुरळ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. 

यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रतितास राहणार असल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील कृषी मौसम सेवा केंद्राने वर्तवले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णता असह्य

राज्यात तापमानाचा चटका असह्य होत असून शनिवारी छत्रपती संभाजी नगर मध्ये 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने नोंदविलेल्या तापमानाचा अंदाजानुसार 24 तासात तापमानात फारसा बदल जाणवणार नसून त्यानंतर हळूहळू दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

बारा वाजण्याच्या आतच जिल्ह्यात तापमानाचा चटका जाणवत असून उन्हाच्या तीव्रतेने घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. मराठवाडी गमचे, स्टोल,रुमाल गुंडाळून लोक घराबाहेर पडत आहेत. सूर्य आग ओकत असून उष्ण झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. 

 

टॅग्स :पाऊसहवामानमराठवाडा