Join us

विदर्भासह राज्यात या भागात पुढील चार दिवस पावसाची शक्यता, कुठे यलो अलर्ट?

By मुक्ता सरदेशमुख | Updated: January 7, 2024 10:00 IST

हवामान विभागाने दिला अंदाज

चक्राकार वाऱ्यांची स्थिती बळकट झाल्याने विदर्भासह दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील चार दिवस पावसाची ही शक्यता राहणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे. दरम्यान, काल रात्री राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. अहमदनगर जिल्ह्यातील राहूरीमध्ये काल हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस झाला.

चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. परिणामी थंडी कमी झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस कडाक्याच्या थंडीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तर वायव्येकडील राज्यांमध्ये धुके राहणार आहे. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. उद्या धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ९ जानेवारी रोजी जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. १० जानेवारीपासून राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित वृत्त-पुढच्या पाच दिवसांत 'या' भागात अवकाळी पावसाची शक्यता

ढगाळ व पावसाळी वातावरण ओसरल्यानंतर म्हणजे गुरुवार दि.११ जानेवारी पासून उत्तर भारतातून उत्तर व ईशान्य दिशेकडून थंड कोरडे वारे वाहतील. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा थंडीची शक्यता जाणवते. तर ६ ते १० जानेवारी पर्यंतच्या ५ दिवसात महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १६ डिग्री से.ग्रेड (म्हणजे सरासरीपेक्षा ४ डिग्रीने अधिक) व दुपारचे कमाल तापमान २८ डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरीइतके) दरम्यानचे असू शकते, अशी शक्यता हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

टॅग्स :पाऊसहवामानतापमान