Join us

काळजी घ्या, पुढील पाच दिवस कडक ऊन, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवार ठरला हॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 1:49 PM

घामाच्या धारा : नागरिक हैराण, किमान तापमानातही वाढ

मंगळवार छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांसाठी हॉट ठरला. मंगळवारी कमाल तापमानाचा पारा ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेला तर किमान तापमानही २६.५ अंश सेल्सिअस होते.

दुपारी रस्त्यावर तुरळक गर्दी होती. यंदा एप्रिल महिन्यात सुरुवातीलाच तापमान चाळिशीपार गेले. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्री उकाडा आणि विजेचा लपंडाव, यामुळे नागरिक यंदाचा उन्हाळा विसरणार नाहीत. मे महिन्यांत वैशाख वणवा पेटल्याप्रमाणे उष्णतेच्या झळा, घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त होत आहेत. दोन दिवसांपासून पुन्हा उकाडा वाढला आहे. पूर्व मोसमी हंगामाला २० दिवस आहेत. त्यामुळे अवकाळी, उष्णतेची लाट असे वातावरण राहील. पुढील काही दिवस तापमान वाढेल, असे हवामान खात्याचे भाकीत आहे.

काळजी घ्या, पुढील पाच दिवस कडक ऊन

तापमानात सतत चढउतार होत आहे. आठ दिवसांपासून ४० अंशांच्या खाली असलेले तापमान मंगळवारी अचानक वर गेले. जिल्हा हवामान केंद्राने दिलेल्या अहवालानुसार, पुढील पाच दिवस कडक तापमानाचे असतील. यामुळे शक्यतो दुपारी उन्हात जाण्याचे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर शहर आणि तालुक्यात २२ मे रोजीचे तापमान जास्तीत जास्त ४३.१ अंश सेल्सिअस असेल. तर कमीत कमी ३०.१ अंश असेल. २३ मे रोजी तापमान कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

गुरुवारी शहराचे कमाल तापमान ४२.२ अंश तर किमान २७.४ असेल. २४ला कमाल ४२.७ व किमान २७.४ असेल. २५ ला ४३.१ अंशापर्यंत तापमान वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. २६ रोजी ४२.२ चा अंदाज आहे. या कालावधीत अंशतः ढगाळ वातावरण असेल, असेही कृषी विभागाच्या हवामान पत्रिकेत नमूद करण्यात आले.

टॅग्स :तापमानऔरंगाबादहवामान