Join us

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सिद्धेश्वर धरणात ७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 9:16 AM

सध्या जलाशयातील पाण्याची स्थिती समाधानकारक असली, तरी येलदरी धरणाच्या पाणीपातळीत मोठी घट निर्माण झाली आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ६४ दलघमी जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या जलाशयातील पाण्याची स्थिती समाधानकारक असली, तरी येलदरी धरणाच्यापाणीपातळीत मोठी घट निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांच्या सिंचनासह पाणीपुरवठा योजनांसाठी आरक्षित पाण्याचा मेळ बसण्यासाठी पाटबंधारे विभागाला कसरत करावी लागणार आहे. पुढील चार महिन्यांचा विचार करता पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

यावर्षी पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. परंतु, जून महिना कोरडाच गेला. त्यानंतर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये पाऊस चांगला झाला. या पावसावर थोड्या प्रमाणात जिल्ह्यातील छोटी-मोठी धरणे काही प्रमाणात भरली. दरम्यान, सिद्धेश्वर धरणाच्या वरच्या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे सिद्धेश्वर धरण ९५ टक्के भरले होते. परंतु, मध्यंतरी रबी हंगामात रोटेशनप्रमाणे पाणी दिल्यामुळे पाणीपातळीत मोठी घट निर्माण होऊन केवळ ३२ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकारी परभणी यांनी पूर्णा शहरासाठी नदीपात्रातून पाणी सोडण्याची सूचना पाटबंधारे विभागास केली होती. त्या अनुषंगाने येलदरी धरणातून विद्युत निर्मितीद्वारे सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जलाशयावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांसह हिवाळी व उन्हाळी हंगामासाठी हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा पुढील सिंचनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या सिद्धेश्वर धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून, कालव्याद्वारे रब्बी हंगामातील शेवटचे आवर्तन दिले जात आहे. त्यानंतर लवकरच उन्हाळी हंगामाच्या पाणीपाळीस सुरुवात होणार आहे.

पाण्याचा अपव्यय टाळा

गत आठवड्यात येलदरी धरणातून विद्युत निर्मितीमधून पाण्याची आवक झाली. त्यामुळे सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊन ६४ दलघमी (७९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. परंतु उन्हाळी हंगामाच्या दोन आवर्तनानंतर पुढील आवर्तनासाठी पाण्याची गरज भासणार आहे. येलदरी धरणात आजमितीस केवळ ४१ टक्केच जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय न करता काटकसरीने पाणी वापरणे आवश्यक आहे, असे सिद्धेश्वर धरण प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :धरणपाणीपरभणी