Join us

Women Farmer Poultry Success Story : पारंपरिक शेतीला जोडधंदाची साथ; कुक्कुटपालनातून त्रिवेणा ताईंची आर्थिक अडचणींवर मात

By रविंद्र जाधव | Updated: November 25, 2024 13:11 IST

Women Farmer Poultry Success Story : कुक्कुटपालनाच्या विविध अंगी यशकथेतून पेरणा घेत दुसरीकडे शेतीतील घटते उत्पन्न लक्षात घेता कुक्कुटपालन करत घोडज येथील त्रिवेणा यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला आहे. त्यांच्या याच प्रवासाची 'ही' यशकथा.

परसबागेतील कुक्कुटपालन अलीकडे एक चांगला शेतीपूरक व्यवसाय म्हणून प्रचलित झाला आहे. मुख्यत: मांस व अंडी मिळवण्यासाठी कुक्कुटपालन केलं जातं. तसेच अलीकडे शहरी भागातही हा व्यवसाय आर्थिक उत्पन्नाच्या स्रोतामुळे प्रचलित झाला आहे.

कुक्कुटपालनाच्या अशाच विविध अंगी यशकथेतून पेरणा घेत दुसरीकडे शेतीतील घटते उत्पन्न लक्षात घेता कुक्कुटपालन करत घोडज येथील त्रिवेणा यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला आहे. त्यांच्या याच प्रवासाची ही यशकथा.

नांदेड जिल्ह्यातील घोडज (ता. कंधार) येथील त्रिवेणा तिरुपती बट्टलवार यांनी आपल्या पारंपरिक शेतीला शेळीपालनाची जोड दिली आहे. त्यांच्याकडे २०-२५ उस्मानाबादी शेळ्या आहेत. मुक्त चराऊ पद्धतीने त्यांच्या कुटुंबातील सदस्य शेळ्यांचे व्यवस्थापन करतात. ज्यातून शेतीउत्पन्नाच्या तुलनेत चांगले अर्थजन होत असल्याने त्रिवेणा यांनी आता शेतीपूरक जोडधंदाची वाट निवडली आहे. ज्यातून त्या आता परसबागेतील कुक्कुटपालन देखील करत आहेत.

संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या माध्यमातून घोडज गावात वातावरण बदलास अनुकूल शेती या विषयावर प्रकल्प कार्यान्वित आहेत. यामध्ये शेती व शेतीपूरक बाबींकरता गावातील शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते.

या प्रकल्पात नाबार्डच्या अर्थसहाय्याने त्रिवेणा यांना एक दिवसाचे दोनशे कुक्कुटपिल्ले मंजूर झाले होते. परंतु कुक्कुटपालनाबाबत त्यांना तांत्रिक माहिती नव्हती म्हणून त्यांनी पिल्ले येण्यापूर्वी कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथून पिल्लांचे संगोपन कसे करावे याबाबत प्रशिक्षण घेतले. यामध्ये त्यांनी परसबागेतील कुक्कुटपालन करताना लागणाऱ्या सर्व बाबींबाबत जाणून घेतले आणि कुक्कुटपालन करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला २० बाय १० फुट आकाराचे घरगुती पद्धतीने शेड उभारले. त्यात व्यवसायिक स्वरूपाचे खाद्य व पाण्याचे भांडे आणले. एक दिवसाच्या पक्षांना ब्रूडिंगची आवश्यकता असते, ही बाब जाणून त्यांनी घरीच ब्रुडर तयार केला आणि पिल्लांना ब्रूडिंगची व्यवस्था केली.

यादरम्यान कृषि विज्ञान केंद्राच्या पशुविज्ञान शास्त्र विभागाच्या नियमित सल्ल्याने त्यांनी व्यवस्थापनात सुधारणा केली. अगदी पिल्लांच्या मृत्यूनंतर त्यांची शवविच्छेदन करून घेण्यासाठी तज्ञांची भेट निश्चित केली आणि त्याविषयी जाणून घेतले. एरवी महिलावर्ग या विषयावर फारसा जागरूक नसतो, परंतु पिल्लांच्या मृत्यूचे कारण जाणून घेऊन त्याविषयी उपाययोजना करण्याचा त्रिवेणा यांनी काटेकोरपणे प्रयत्न केला, हे विशेष.

व्यवस्थापनाच्या जोरावर प्रगती 

कोंबड्यांना दिवसातून तीन वेळा स्वच्छ पाणी, खाद्याची पाणी व भांडी स्वच्छ ठेवून चांगल्या प्रतीचे खाद्य पुरविणे, पिल्लांच्या आरोग्यासाठी व वाढीसाठी नियमित औषध देणे, याशिवाय कृषि विज्ञान केंद्राकडून माहिती घेऊन वेळोवेळी लसीकरण देखील त्रिवेणा करतात. यामुळे आजारी पक्षी ओळखून त्यावर वेळीच उपचार होत असल्याने पक्षांमध्ये मृत्यू कमी झाला आहे. त्याचबरोबर कोंबड्यांचे सरासरी दोन किलोपर्यंत वजन वाढल्याचे त्रिवेणा सांगतात. तसेच खाद्यात व्यावसायिक खाद्य न देता घरगुती पद्धतीने गहू व तांदुळ यांच्यापासून कोंबडी खाद्य तयार केले जाते.

घरगुती खाद्य, अंडी विक्री करून कुटुंबाला आर्थिक हातभार

परसबागेतील कुक्कुटपालनातून त्रिवेणा यांनी गेल्या चार ते पाच महिन्यांत एकूण रु. ४०,००० उत्पन्न मिळवले आहे. कोंबड्यांची विक्री करून त्यांना अधिक नफा मिळाला आहे. सध्या त्यांच्याकडे वीस कोंबड्या आहेत, ज्यातून ते अंड्यांचे उत्पन्न घेत आहेत. बाकी कोंबड्या त्यांनी विकल्या आहेत.

तर वीस कोंबड्यांपासून दररोज १० ते १५ अंडे मिळतात. या अंड्यांची स्थानिक बाजारात विक्री करून नियमित उत्पन्न मिळवतात. तसेच, कोंबड्यांच्या सहाय्याने नैसर्गिक उबवणी करून पिल्ले सुद्धा मिळवतात. यामधून त्रिवेणा दरमहा ४ ते ५ हजार रुपयांची अतिरिक्त उत्पन्न मिळवतात म्हणजेच वार्षिक ५० ते ६० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात लावतात.

महिला शेतकऱ्यांना प्रेरणादायी

त्रिवेणा यांनी चिकाटीने कुक्कुटपालन व्यवस्थापन, जैविक संरक्षण, लसीकरण, घरगुती खाद्य निर्मिती, कोंबड्यांचे विपणन, शेडचे व्यवस्थापन, यासह व्यवसायातील अर्थशास्त्र समजून त्याचा सुयोग्य वापर केला आणि आत्मविश्वासाने व्यवसायात आपले स्थान निश्चित केले. त्यांच्याकडून शिकून इतर महिला शेतकऱ्यांना देखील असा शेतीपूरक व्यवसाय केला तर शेतकऱ्यांच्या घरोघरी समृद्धी येईल.

शब्दांकन 

डॉ. निहाल अहमद मुल्लाविषय विशेषज्ञ पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड.

डॉ. प्रवीण चव्हाण विषय विशेषज्ञ कृषि विस्तार, संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड.

हेही वाचा : Farmer Success Story : अभियंता तरुणाचा यशस्वी फूलशेती प्रयोग; तीन एकरात बहरली फुलांची राणी 'शेवंती'

टॅग्स :पोल्ट्रीशेती क्षेत्रनांदेडनांदेडमराठवाडाशेतीशेळीपालन