Pune : दौंड तालुक्यातील कडेठाण येथील निलम दिवेकर यांनी पुणे जिल्ह्यातील पहिल्या महिला ड्रोन पायलट होण्याचा मान मिळवला आहे. पंतप्रधान नमो ड्रोन दिदी योजनेतून त्यांना मिळालेल्या ड्रोनच्या साहाय्याने त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. या माध्यमातून त्या कडेठाणपासून साधारण २०० किमी अंतरापर्यंत जाऊन फवारणी करत आहेत.
दौंड तालुक्यातील कडेठाण हे गाव पुण्यापासून साधारण ७० किमी अंतरावर आहे. साखर कारखाने असल्यामुळे या परिसरात प्रामुख्याने उसाची शेती केली जाते. निलम दिवेकर या गावातील महिला बचत गटाच्या म्हणजेच महिला स्वयंसहाय्यता गटाच्या अध्यक्षा होत्या. त्यानंतर त्या ग्रामसंघाच्या आणि पुढे प्रभाग संघाच्या अध्यक्षा बनल्या. उमेदच्या माध्यमातून त्यांनी स्वयंसहाय्यता गटाच्या महिला म्हणून ड्रोन दिदीसाठी अर्ज केला आणि ड्रोन मंजूर झाला. यासाठी त्यांना एकही रूपयाचा खर्च आला नाही. पीपीएल खत कंपनीमार्फत त्यांना ड्रोन घरपोहोच देण्यात आला.
मंजुरीनंतर त्यांनी फलटण येथील तारामित्र ड्रोन अॅकॅडमी मध्ये ड्रोन पायलटचे प्रशिक्षण घेतले. ड्रोन मिळाल्यानंतरही त्यांना कंपनीच्या प्रतिनीधीकडून प्रशिक्षण देण्यात आले. पुढील काही दिवस त्यांनी स्वतःच्या शेतात सराव केला आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतावर ड्रोन फवारणीला सुरूवात केली.
पाणी, औषध आणि वेळेची बचतपारंपारिक पद्धतीने एका एकराला फवारणी करण्यासाठी साधारणपणे २०० लीटर पाणी लागते. पण ड्रोन फवारणीमध्ये केवळ १० ते १५ लीटर पाण्यामध्ये एका एकरावरील फवारणी पूर्ण होते. आणि या फवारणीसाठी केवळ ७ ते १० मिनिटे वेळ लागतो. विशेष म्हणजे दोन एकरसाठी लागणाऱ्या औषधामध्ये तीन एकरची फवारणी ड्रोनद्वारे होते त्यामुळे ड्रोन तंत्रज्ञान फायद्याचे असल्याचं त्या सांगतात.
सन्मान आणि कौतुकड्रोन दिदी असलेल्या निलम यांच्या कामाची दखल अनेक पातळीवर घेण्यात आली. त्यांना १५ ऑगस्ट २०२४ मध्ये दिल्ली येथे पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते, त्याबरोबरच भोपाळ येथे पंतप्रधान आणि कृषीमंत्र्यांच्या कार्यक्रमालासुद्धा बोलावण्यात आले होते. पुण्यातील अटारी येथे पार पडलेल्या कार्यक्रमातसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
सात ते आठ तालुक्यांमध्ये फवारणीनिलम यांनी आत्तापर्यंत दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर, हवेली, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्यांमध्ये फवारणी केली आहे. अनेक शेतकरी पुन्हा फवारणीसाठी बोलावतात. कडेठाणपासून साधारणपणे १५० ते २०० किमी अंतरावरील शेतकऱ्यांच्या शेतावर फवारणी केल्याचं त्या सांगतात. जसं अंतर वाढेल त्याप्रमाणे फवारणीसाठी जास्त पैसे घेतले जातात.
कुटुंबियांची साथत्यांना या कामामध्ये त्यांची पती भीमराव दिवेकर यांची चांगली साथ लाभली. प्रशिक्षणासाठी सात-सात दिवस घराच्या बाहेर राहण्यासाठी आणि त्यानंतर फवारणीसाठीही बाहेर जाण्याची परवानगी त्यांच्या पतीने त्यांना दिली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत असल्याचं त्या सांगतात. आज त्यांचे पती आणि मुलगा दोघेही चांगले ड्रोन पायलट झाले आहेत.
उत्पन्नएका एकर फवारणीसाठी ६०० रूपयांपासून ८०० रूपयांपर्यंत पैसे आकारले जातात. तर एका दिवसाला कमीत कमी चार ते जास्तीत जास्त १५ ते २० एकरपर्यंत फवारणी केली जाते. अनेकदा त्यांनी २० एकरपेक्षाही जास्त क्षेत्रावर फवारणी केली आहे. सरासरी १० एकर फवारणी विचारात घेतली तर त्यांना ६ ते ७ हजार रूपये मिळतात. त्यातील प्रवास खर्च, चार्जिंग, मजुरी आणि मेंटनन्स वगळला तर महिन्याकाठी ६० हजार ते १ लाख रूपयांचा नफा यातून त्यांना शिल्लक राहतो.