Join us

रेशीम उद्योगात महिलांना आदर्श ठरणारी रेशीम 'प्रतिभा' आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 12:48 IST

डफळापूर (ता. जत) येथील महिला रेशीम उद्योजक प्रतिभा विजयकुमार कदम या गेली चार वर्षे रेशीम उद्योग करत आहेत, दर दीड महिन्याला रेशीमचे उत्पादन घेऊन त्यांना ४० हजार ते ६० हजार रुपये निव्वळ नफा मिळतो आहे.

संजयकुमार गुरवडफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील महिला रेशीम उद्योजक प्रतिभा विजयकुमार कदम या गेली चार वर्षे रेशीम उद्योग करत आहेत, दर दीड महिन्याला रेशीमचे उत्पादन घेऊन त्यांना ४० हजार ते ६० हजार रुपये निव्वळ नफा मिळतो आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या प्रतिभा कदम यांनी रेशीम उद्योगाबाबत माहिती घेऊन चार वर्षांपूर्वी उद्योग सुरू केला.

त्यांची दीड एकर तुतीची बाग असून पंचवीस बाय पन्नास फूट आकाराचे शेड आहे. या शेडमध्ये प्रत्येक दीड महिन्याला दोन महिला मजुरांच्या मदतीने त्या शंभर ते दीडशेची बॅच घेत आहेत. या बॅचमधून दीड महिन्याला ९० ते १२० किलो रेशीम कोश उत्पादन मिळते. सध्या पाचशे रुपये किलोचा दर मिळतो, खर्च वजा दीड महिन्याला ६० हजार रुपये नफा मिळतो.

रेशीम उत्पादन हा शेतीपूरकव्यवसाय आहे. हा व्यवसाय अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पद्धत व नवीन कीटक संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय कमी खर्चात व्यापक स्वरूपात करता येतो. घरातील लहान थोर माणसांची मदतही व्यवसायात होऊ शकते.

अधिक वाचा: आले पिकातून कोट्याधीश होता येतंय.... वाचा या शेतकऱ्याची कहाणी

कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येते तुती लागवड निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते, एकदा तुतीची लागवड केल्यानंतर पंधरा वर्षी पाने मिळतात. तुतीस एप्रिल-मे महिन्यात पाणी मिळाले नाही तरी फरक पडत नाही.

प्रतिभा कदम म्हणाल्या...मला शेतीची आवड आहे. आम्ही ज्वारी, हळद, ऊस, बाजरी, मका, भाजीपाला आदी पिके घेत होतो. रेशीम उद्योग फायद्याचा आहे. आम्ही दीड एकर तुतीची लागवड केली. पती शिक्षक असल्याने ते शाळेत जातात व दोन मुले परगावी उच्च शिक्षण घेत आहेत. मी घरचे काम करून सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास काम करते. यातून चांगले उत्पादन मिळत असल्याने मी समाधानी आहे. महिलांनी रेशीम उद्योग करून स्वतःच्या पायावर उभे राहावे.

टॅग्स :रेशीमशेतीमहिलाजाटशेतीशेतकरीव्यवसाय