Join us
Daily Top 2Weekly Top 5

केळीच्या पिकात खरबुजाचाही गोडवा! २१ टनातून तीन लाख रुपयांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 11:04 IST

कमी कालावधीत व एकाच खर्चामध्ये दोन पिके घेण्याची किमया, २१ टनांतून ३ तीन लाख रुपये नफा

वर्षभर एकाच पिकाच्या उत्पन्नाची वाट न पाहता त्याच पिकांमध्ये आंतरपीक घेऊन उत्पन्न काढण्याची किमया अर्धापूर तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांनी करून दाखविली आहे.

तालुक्यातील लहान तांडा येथील तरुण शेतकरी बालाजी राठोड यांच्याकडे आठ एकर जमीन आहे. यामध्ये प्रामुख्याने केळी, हळद, सोयाबीन, कापूस पिकांची लागवड केली जात होती. केळी व हळद पिकांचे उत्पन्न मिळण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागत आहे. याकरिता कमी कालावधीत व एकाच खर्चामध्ये दोन पिके घेण्याची किमया केली आहे.

गावरान कोंबडीपालनातून वर्षाला साडेतीन लाखांचा नफा, तरुणाची बेरोजगारीवर मात

पिकांचा लागवड खर्च कमी, उत्पन्नाची अधिक हमी, हे लक्षात घेऊन लहान तांडा शिवारातील शेतकऱ्यांनी सव्वादोन एकरात खरबूज व केळीची लागवड केली आहे. एकाच लागवड खर्चात दोन पिके मिळत असल्याने शेतकऱ्याचा खर्चही वाचला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला केळी व खरबुजाची लागवड केली आहे. सव्वादोन एकरांत केळीची २,९०० रोपे लावली, तर केळीमध्ये अंतर्गत पीक १,६०० खरबूज रोपांची लागवड केली आहे. मागील आठवड्यात खरबुजाचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत २१ टन खरबुजाची तोडणी झाली आहे. खरबुजाला बाजारपेठ २० ते २५ रुपये भाव मिळाला आहे. २१ टनांतून ३ तीन लाख रुपये नफा झाला आहे. आणखी ५ टन उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. एका पिकाचे उत्पन्न मिळण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागते, तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे अंतर्गत पीक घेतले आहे. एकाच खर्चात जास्तीचे उत्पन्न मिळाले आणि नवीन वेगळ्या पद्धतीने पिके घेऊन जादा नफा मिळवला आहे, असे बालाजी राठोड यांनी सांगितले.

कहाणी उसाच्या गुऱ्हाळांची; साखरेच्या पट्ट्याला सेंद्रिय गुळाची गोडी

केळी व खरबूज ठिबकद्वारे पाणी व खत

एका पिकासाठी जो खर्च येत आहे. त्याच खर्चात दोन पिके घेतली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळत आहे. जे पाणी व खत खरबूज दिले जात आहे. तेच पाणी व खत केळीला आपोआप मिळत आहे. त्यामुळे दुहेरी खर्च करण्याची गरज नाही, असे शेतकऱ्याने सांगितले आहे.

टॅग्स :केळीशेतकरी