Join us

डफडे कुटुंबाने गुढी पाडव्याच्या दिवशी तयार केल्या १२ क्विंटल साखरगाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 12:30 PM

गावातील महिलांनाही मिळाला रोजगार

हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील जवळाबाजार येथील डफडे कुटुंबीयांनी गुढी पाडव्याच्या दिवशी जवळपास १२ क्विंटल साखरगाठी तयार करून त्यातून १५ हजार रुपये मिळविले. या व्यवसायामुळे शेजारच्या काही महिलांनाही यानिमित्ताने रोजगार मिळाला.

गत २० वर्षांपासून जवळाबाजार येथील डफडे कुटुंब साखरगाठीचा घरगुती व्यवसाय करत आहे. जिल्ह्यातील नागरिकांमध्ये साखरगाठी जावी आणि त्यांना पुढच्यावेळेस पसंतीस उतरावी म्हणून हे कुटुंब प्रयत्न करीत आहे. याहीवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी घरातील व इतर महिलांना एकत्रित करून १२ क्विंटल साखरगाठी तयार करून बाजारपेठेत विक्रीसाठी आणली.

जवळाबाजार येथील सारंग डफडे यांचे कुटुंब दरवर्षी साखरगाठी तयार करते. यावर्षी गुढी पाडव्याच्या एक महिना अगोदरपासूनच साखरगाठी तयार करण्याचे काम सुरू केले. जवळाबाजारसह परिसरातील आजरसोंडा, तपोवन, करंजाळा, पोटा, नालेगाव, पूरजळसह, औंढा, नागरिक व दुकानदारांनी शिरडशहापूर आदी गावातील अनेक साखरगाठीला पसंती दिली. तसेच यानिमित्ताने गावातील महिलांना रोजगार मिळाला.

पुढच्यावर्षी जिल्ह्याबाहेर पाठविणार साखर गाठी

साखरगाठीला मागणी वाढली तर पुढच्यावेळी इतर जिल्ह्यात गाठी पाठविल्या जाणार आहेत. दरवर्षी साखरगाठी तयार करण्यासाठी ५ ते ६ हजार रुपये खर्च येतो. यानंतर इतर महिलांना मदतीला बोलाविले तर त्यांची मजुरी वेगळीच आहे. आज नफा जरी मिळत नसला तरी पुढे चालून घराला हातभार मिळेल असे वाटते म्हणून हा उद्योग सुरू केला आहे. यावर्षी साखरगाठीसाठी १० ते १५ क्विंटल साखर लागली आहे.

हेही वाचा - शेळीपालनात उत्पन्नाची हमी; वर्षभर मागणी असलेला शेतीपूरक व्यवसाय

टॅग्स :गुढीपाडवाशेतकरीशेतीसाखर कारखाने