Join us
Daily Top 2Weekly Top 5

Success Story : रेशीम उद्योगाशी गाठ बांंधली तेव्हा अंजनाबाईंचा संसार रुळावर आला

By गोकुळ पवार | Updated: January 3, 2024 17:28 IST

दुष्काळी संकटाचा सामना करीत कृषी विभागाच्या मदतीने महिला शेतकरी अंजनाबाई बच्छाव यांनी शेतात रेशीम उद्योग उभारला आहे.

मालेगाव : पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत मालेगाव तालुक्यातील चिखल ओहोळ येथील महिला शेतकरी अंजनाबाई बच्छाव यांनी शाश्वत आणि जास्त उत्पादन देणाऱ्या रेशीम उद्योगातून क्रांती घडविली. दुष्काळी संकटाचा सामना करीत कृषी विभागाच्या मदतीने त्यांनी शेतात रेशीम उद्योग उभारला आहे. रेशीम उद्योगाची गाठ बांधल्यामुळेच कुटुंबाचा आर्थिक गाडा रुळावर आल्याचे शेतकरी अंजनाबाई बच्छाव यांनी सांगितले.

मालेगाव तालुक्यातील चिखल ओहोळ भागात शेतात मुबलक पाण्याची उपलब्धता असल्याने अन्य शेतकरी खरीप हंगामात कापूस किंवा बाजरीसारखी पिके घेत होते. इतर क्षेत्र मध्यम व हलक्या जमिनीचे असल्याने काही शेतकरी भाजीपाला घेतात. त्यामुळे शेतकरी अंजनाबाई रोजंदारीने कुटुंबासोबत जात होत्या. आपल्या शेतात शेतीशी निगडित जोड व्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. नवीन व्यवसायाच्या शोधात असलेल्या अंजनाबाईंच्या मदतीला कृषी विभागाची साथ मिळाली. 

दरम्यान चिखल ओहोळ गावातील कृषी सहायक मनीषा पवार यांच्या मदतीने कृषी विभागाकडे ऑनलाइन अर्ज केला. त्यानंतर मिळालेल्या प्रशिक्षणानंतर आपण ही पारंपरिक शेतीला रेशीम उद्योगाची जोड देऊ शकतो, अशी त्यांना खात्री झाली. चिखल ओहोळमधील अंजनाबाईनी रेशीम शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पादन मिळविल्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीचे पर्याय स्वीकारले.पारंपरिक शेती करत असताना खूप कष्ट करावे लागतात. हवा तसा मोबदला मिळत नसल्याने शेतात तुतीची लागवड केली आहे. यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ आहिरे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्दे, मंडळ अधिकारी मोहिनी मोरे, कृषी सहायक मनीषा पवार यांनी मदत मिळाली.

दरमहा 60 ते 70 हजार उत्पन्न अंजनाबाई एकेकाळी कुटुंबासह रोजंदारीने शेतात काम करून कुटुंबाचा गाडा चालवित होत्या, जोड व्यवसाय करून दरमहा 6 ते 8 हजार रुपये मिळावे, यासाठी नवीन जोड व्यवसायाच्या शोधात असलेल्या अंजनाबाईंना कृषी विभागाची संजीवनी मिळाल्याने त्या रेशीम उद्योगातून दरमहा 60 ते 70 हजार उत्पन्न घेत आहेत. कमी पाण्यावर फुलणाऱ्या रेशीम शेतीतून निघणारा माल चिखलओहोळ येथून जालना व बीडच्या बाजारपेठ जातो. यामधून अंजनाबाईंचा परिवार दरवर्षी लाखोंचे उत्पन्न घेत आहे. दरमहा 60 ते 70 हजार उत्पन्न घेत आहेत.

टॅग्स :नाशिकमालेगांवशेतकरी