Join us

Success Story : हळद आणि आल्यात या परभणीच्या शेतकर्‍याचा नाद नाही करायचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 6:11 PM

शेतात सेंद्रिय पद्धतीवर भर देत हळदीसह आल्यातून विक्रमी उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधत असलेल्या परभणी येथील निलाबाई यांच्या आयुष्याच्या खडतर प्रवासाची ही यशकथा.

त्र्यंबक वडसकर

मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं, बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं ... कवी प्रा. इंदजीत भालेराव यांच्या कवितेचा हा संस्कार आपल्या मुलांत पेरून आयुष्य शेतीसाठी अर्पण करणाऱ्या आणि मातीतून सोनं पिकवणाऱ्या कर्तुत्ववान परभणीतील माळसोन्नाच्या निलाबाई नारायणराव दहे.

आयुष्याचा जीवन प्रवास खडतर, संघर्षमय मात्र तितकाच तो इतरांसाठी प्रेरणादायी असलेल्या निलाबाई आहे. दोन छोटी मुले यांना घेऊन एका एकरात शेतीसह मोलमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू असतांनाच नियतीने त्यांना आयुष्यात अनेक कहू, गोड अनुभव दिले.

आपल्या दोन लेकरांना घेऊन बारा वर्षे मजुरीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मुलांना वाढवले. मुलांना नोकरी मिळाली नाही तरी शेतीतून चांगले उत्पन्न घेता येते, हा विश्वास त्यांच्यात जागृत केला, मोठा मुलगा भाऊसाहेब आणि छोटा तुकाराम यांच्या सहकायनि शेतीपूरक व्यवसाय केला, यातूनच साडेतीन एकर शेती विकत घेतली, शेतीसाठी पाणी पाहिजे म्हणून स्वतःचे दागिने मोडून शेतात बोअर घेतला.

• निलाबाई यांनी सेंद्रियसह आधुनिक पद्धतीने शेतीला प्राधान्य दिले. २००६ मध्ये हळदी पिकांसह शेती बेणे निर्मितीला सुरुवात झाली. सेंद्रिय शेतीवर भर दिल्याने अपेक्षित उत्पन्न घेतले. हळूहळू प्रगती होत गेल्याने या कुटुंबाकडे आज बारा एकर शेती झाली. शेतीत वेगवेगळे प्रयोग करत पंढरपूर, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आदी जिल्ह्यातही हळदीच्या बेण्याची मागणी वाढली.

• महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, युरोप देशातही हळदीची बेणे पोहोचले. आजही कुटुंबातील सर्व सदस्य शेतात राबतात, निलाबाई यांचे आज ८० वय असूनही त्या शेतात काम करतात.

जीवन एक संघर्ष

निलाबाई दहे यांचे आयुष्य सुरुवातीपासूनच खडतर, पतीच्या निधनानंतर स्वतःला सावरत खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या. त्यांनी मुलांना घेऊन शेतीत आधुनिक पद्धतीने सुधारणा केली. पण नियतीने पुन्हा एकदा डाय साधला आणि कोरोना काळात कर्तुत्ववान मुलगा तुकारामला काळाने हिरावला.

शेतात सेंद्रिय पद्धतीवर भर देत हळदीसह आल्यातून विक्रमी उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधले. याचाच परिणाम म्हणून त्यांचा छोटा मुलगा स्व.  तुकाराम दहे यांना २०११ साली महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार मिळाला, महाराष्ट्रातील सर्वात तरुण कृषी भूषण निलाबाई यांनी घडवला, तुकाराम व आबासाहेब दहे यांनी शेतीत केलेले विविध प्रयोग पाहण्यासाठी महाराष्ट्रसह बाहेर राज्यातूनही शेतकरी त्यांच्या शेतात भेटी देत माहिती जाणून घेतात हे विशेष.

टॅग्स :शेतीमराठवाडाशेतकरीपरभणी