Pune : शेतमालाल हमीभाव मिळत नसल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे साधारण ९० हजार कोटींचे नुकसान होते. पण हे नुकसान टाळण्यासाठी सोलर ड्रायर ही संकल्पना फायद्याची ठरू शकते हेच ध्येय समोर ठेवून इंदौर येथील मायलेकराने रहेजा सोलर फूड प्रोसेसिंग कंपनी स्थापन केली. या कंपनीने शार्क टँक मधून तब्बल १ कोटी ७५ लाखांची फंडिंग मिळवली असून शेतकऱ्यांसाठी आणि प्रक्रिया उद्योगासाठी ही महत्त्वाची आणि अभिमानाची बाब आहे.
जुन्या काळातील महिला अनेक भाज्या सुकवून त्या वर्षभर वापरायच्या. यातूनच बबिता रहेजा आणि त्यांचा मुलगा वरूण रहेजा यांना संकल्पना सुचली आणि याच तंत्रज्ञानाचा वापर आपण शेतकऱ्यांसाठी करू शकतो आणि शेतकऱ्यांचे ९० हजार कोटी रूपये वाचवू शकतो असं त्यांच्या लक्षात आलं. या विचारातून त्यांनी रहेजा सोलर फूड प्रोसेसिंग ग्रुपची स्थापना केली होती.
हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचून फायदा व्हावा यासाठी आणि गुंतवणूक मिळवण्यासाठी त्यांनी शार्क टँकमध्ये सहभाग घेतला होता. शार्क टँकमधून शार्क विनिता सिंह, पीयूष बंसल आणि कुणाल बहल यांना सोलर ड्रायर ही आयडिया चांगली वाटली आणि या तिघांनी मिळून या कंपनीमध्ये १ कोटी ७५ लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे.
या कंपनीने सोलर ड्रायर तयार केला असून हा शेतकऱ्यांसाठी, पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी चांगला आहे. या ड्रायरमधून फळे, पालेभाज्या, फळभाज्या सुकवल्या जातात. त्यामुळे दर नसला तरी शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे सुकवून त्याची टिकवणक्षमता वाढवता येते. परिणामी सुकवलेल्या उत्पादनांना फ्रेश मालापेक्षा जास्त दर मिळतो.
भाजी सुकवून वर्षभर वापरणाऱ्या आज्जीकडे पाहून सुरू झालेला मायलेकरांचा हा बिझनेस आत्ता कोट्यावधींची उलाढाल करतोय. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीवर मात करण्यासाठी सोलर ड्रायर तंत्रज्ञान नक्कीच फायद्याचे ठरेल...!