Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nursery Business : पारंपारिक शेतीला फाटा देत नर्सरी व्यवसायातून सिंगापूरच्या कोरडे कुटुंबियांची आर्थिक उन्नती

By दत्ता लवांडे | Updated: July 9, 2024 21:29 IST

Nursery Business Success Story : पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील कोरडे कुटुंबियांनी २०१७ साली नर्सरी व्यवसायाला सुरूवात केली आणि आता ते यातून चांगला नफा कमावत आहेत.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जिरायती पट्ट्यात पारंपारिक पिकाला फाटा देऊन नर्सरी व्यवसाय करून सिंगापूर येथील कोरडे कुटुंबीय चांगला आर्थिक नफा कमावत आहेत. ग्राहकांची विश्वासार्हता कमावल्याने त्यांच्या साई हायटेक नर्सरीच्या व्यवसायातून त्यांची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. 

पुरंदर तालुक्यातील सिंगापूर हे अत्यल्प पाऊस पडणारे गाव. अंजीर, सिताफळ आणि तरकारी पिके हे येथील प्रमुख पिके. त्यातच पुरंदरच्या सिताफळ आणि अंजीराला भौगौलिक मानांकन मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना जगात ओळख मिळाली आहे. पण येथीलच कोरडे कुटुंबियांनी पारंपारिक पिकांची शेती न करता जोडव्यवसाय करण्याचा संकल्प केला. 

साधारण २०१७ साली त्यांना पेरूची लागवड करायची होती. त्यासाठी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातून पेरूची रोपे आणली, पण त्यावेळी त्यांना खात्रीशीर रोपे मिळाली नाही. आपली ज्याप्रकारे फसवणूक झाली त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांची अशाच प्रकारे फसवणूक होत असेल असा विचार करून कोरडे यांनी आपणच खात्रीशीर फळझाडांच्या रोपांची नर्सरी सुरू करण्याचा विचार केला. त्याचवर्षी त्यांनी एका छोट्या शेडमधून नर्सरीला सुरूवात केली. 

पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्याकडे अगदी थोडे झाडे विक्रीसाठी होती. पुढे त्यांनी एकेक शेतकऱ्यांना नर्सरीविषयी सांगण्यास सुरूवात केली. हळूहळू विक्री वाढत गेली आणि खात्रीशीर रोपे असल्यामुळे ग्राहकांमध्ये विश्वासार्हताही वाढत गेली. विक्री वाढल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या वाणांची रोपे आणण्यास सुरूवात केली. 

विविध राज्यांतून रोपांची खरेदीआपण ज्या शेतकऱ्यांना फळांची रोपे देतो ते खात्रीशीर असायला हवेत या उद्देशाने कोरडे कुटुंबीय थेट केरळातून खात्रीशीर नारळांची खरेदी करतात. पेरू, मसाल्यांची झाडे आणि अजूनही विविध रोपे ते परराज्यांतून खरेदी करतात. त्याचबरोबर झाडांचा डेमो प्लॉटही त्यांच्याकडे पाहायला मिळतो.

खात्रीशीर रोपांमुळे ग्राहकांचा विश्वास कोरडे यांच्या साई हायटेक नर्सरीतून घेतलेल्या रोपांची खात्री असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे. येथून नेलेले एकही रोप आत्तापर्यंत वाया गेले किंवा त्याला फळ लागले नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या नसल्याचं कोरडे कुटुंबीय सांगतात. 

रोपांमधील विविधतायेथे केवळ नारळ, आंबा, अंजीर, सिताफळ, पेरू, डाळिंब अशी फळझाडे नाहीतर जी फळझाडे सामान्य शेतकऱ्यांना माहितीही नाहीत अशा रोपांची उपलब्धता आहे. यांच्याकडे आंब्याचे २० प्रकारचे वाण उपलब्ध आहेत. रूद्राक्ष, स्टार फ्रूट, अवॉकोडा, मसाले, काळी मिरी, जपानी पर्पल आंबा, बारमाही फळे देणारा आंबा, काळा आंबा अशा कित्येक विविध रोपांची उपलब्धता या नर्सरीमध्ये आहे.

सेंद्रीय खते आणि तंत्रज्ञानाचा वापरया नर्सरीमध्ये प्रत्येक रोपाला सेंद्रीय निविष्ठा दिल्या जातात. सुभाष पाळेकर कृषी पद्धतीनुसार येथे एकाही रोपाला रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. दरम्यान, मजुरांची अडचण असल्यामुळे त्यांनी नर्सरीमध्ये स्वयंचलित फॉगर सिस्टिम बसवली आहे. यामुळे दिवसभरात एका मजुराचे पैसे वाचतात. 

व्यवसायात कुटुंबाची भक्कम साथया व्यवसायामध्ये माऊली कोरडे (वडील), संजय कोरडे (मुलगा) आणि महेश कोरडे (मुलगा) हे तिघेही जोमाने काम करतात. दररोजच्या कामामध्ये घरातील महिला आणि लहान मुलेही पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. संजय कोरडे हे नोकरी करत असूनही सुट्टीच्या दिवशी नर्सरीवर काम करतात. त्याचबरोबर नर्सरीच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंगची सर्व कामे संजय हेच करतात. 

उत्पन्नकोरडे यांना पारंपारिक शेतीतून वर्षाकाठी दोन ते तीन लाख रूपयांचे उत्पन्न होत होते. पण नर्सरी व्यवसायातून खर्च वजा जाता १० ते १२ लाख रूपयांचा नफा होतो. यामध्ये काटेकोर नियोजन असल्याने चांगला नफा राहतो असे कोरडे कुटुंबीय सांगतात. 

ग्राहकांना खात्रीची माल देणे, फक्त पैशांसाठी अनोळखी किंवा लांबून आलेल्या ग्राहकांची फसवणूक न करणे, एकदा आलेले ग्राहक पुन्हा रोपे खरेदीसाठी आपल्याकडे आले पाहिजेत या ध्येयाने सेवा देणे हेच साई हायटेक नर्सरीच्या यशाचे गमक असल्याचं कोरडे कुटुंबीय सांगतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणे