Join us

Mushroom Farming : मशरूम शेतीतून बाबूरावांना मिळाले लाखोंचे उत्पन्न कसे ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 16:24 IST

Mushroom Farming : केवळ २० बाय ४० आकाराच्या जागेवर मशरूम पिकविण्याचा नवा व्यवसाय सुरू करून हा शेतकरी त्यातून ४५ दिवसाला तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवीत आहे. कसे ते वाचा सविस्तर

फिरोज पठाण

बाबरा : जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत करण्याची तयारी, आत्मविश्वास हे गुण अंगी असतील तर व्यवसाय कुठलाही असो, त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. याबाबत फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव येथील एका शेतकऱ्याचे उदाहरण द्यावे लागेल.

केवळ २० बाय ४० आकाराच्या जागेवर मशरूम (Mushroom) पिकविण्याचा नवा व्यवसाय सुरू करून हा शेतकरी (farmer) त्यातून ४५ दिवसाला तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवीत आहे. यामुळे या शेतकऱ्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बाबूराव बनसोड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. बनसोड यांनी २० बाय ४० आकाराच्या एका खोलीमध्ये मशरूम पिकविण्याचा नवा व्यवसाय सुरू केला आहे.

अशी केली सुरूवात

* मशरूम पिकविण्यासाठी पाच किलोची प्लास्टिक कॅरी बॅग लागते. त्यात गहू किंवा सोयाबीनचा भुसा टाकला जातो. त्यानंतर एका कॅरिबॅग मध्ये मशरूमचे १०० ग्रॅम बियाणे टाकले जाते.

* केवळ २० दिवसांत मशरूम ही वनस्पती तयार होऊन उत्पन्नाला  सुरुवात होते. मशरूमचे बियाणे केवळ १२० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.

* एका वेळी १० किलो बियाण्यापासून सुमारे १० किलो सुका मशरूम मिळतो. तो गुणवत्तेनुसार ५०० ते ७०० रुपये किलो दराने विकलाजातो.

* बनसोड यांनी केवळ २० बाय ४० आकाराच्या जागेवर मशरूम पिकविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून बनसोड हे ४५ दिवसाला तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवीत आहेत.

आरोग्यासाठी लाभदायक

* मशरूम खाण्यास स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

* त्यात प्रोटीन, व्हिटॅमिन डी, असल्याने मशरूमचा वापर अनेक प्रकारच्या औषधी बनवण्यासाठी केला जातो. यातील पोषकतत्व शरीराला अनेक धोकादायक आजारांपासून वाचवतात.

* याशिवाय त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.

मी २० बाय ४० आकाराच्या खोलीत १ हजार ३०० कॅरिबॅग ठेवून त्यात गव्हाचा भुसा टाकला आहे. त्यात मशरूमचे बियाणे टाकून या कॅरिबॅग थंड वातावरणात ठेवल्या. प्लास्टिक कॅरिबॅग, सुई दोरा, गव्हाचा भुसा आणि मजुरी असा एकूण जवळपास एक लाख रुपयांचा खर्च मशरूम पिकविण्यासाठी येतो. ४५ दिवसानंतर या मशरूमचे चार लाख रुपयांचे उत्पन्न निघते. एक लाख रुपये खर्च वजा केल्यास व्यवसायातून तीन लाख रुपये मिळतात. - बाबूराव बनसोड, शेतकरी, बोधेगाव

हे ही वाचा सविस्तर :  CCI in High Court : भारतीय कापूस महामंडळाला हायकोर्टाने फटकारले; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती