Join us

नोकरीचा मार्ग सोडत दुष्काळग्रस्त भागात तरुणाने उभारली संत्र्याची बाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 10:20 IST

विहिरीच्या पाण्यावर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जोपासली फळबाग.

नितीन कांबळे

शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न धावता शेतीतूनही आर्थिक उन्नती साधता येते. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर शेती केल्यास नक्कीच हाताला यश मिळते. याचे उत्तम उदाहरण 'खर्च हजारांत आणि उत्पन्न अडीच लाखांत' घेता येत असल्याचे कडा येथील शेतकऱ्याने दाखवून दिले. शेतकऱ्याच्या संत्रा बागेची ही यशोगाथा..!

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील श्याम विष्णू कर्डिले हा बारावी शिक्षण झालेला तरुण शेतकरी. शेतीत कष्ट आणि मेहनत करण्याची जिद्द अंगात असल्याने तीन वर्षांपूर्वी त्याने दीड एकरांत २५६ संत्र्यांच्या झाडांची १५ बाय १५ वर लागवड केली. विहिरीच्या पाण्यावर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ही फळबाग जोपासली.

यासाठी रोपे, लागवड, ठिबक असा एकूण ८० हजार रुपये खर्च झाला. इतर हंगामातील शेतीकामे करून त्याने संत्रा बाग जोपासली. आता बागेतील झाडांना मोठ्या प्रमाणावर फळं लागली आहेत. फळांचे ओझे झाडाला पेलवत नसल्याने बांबूचा आधार द्यावा लागत आहे. संत्र्यांतून जवळपास अडीच लाखांचे उत्पन्न पदरात पडेल, असा अंदाज कर्डिले यांना आहे.

शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा आधुनिक शेती करा. आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून फळबागांची शेती केल्यास आर्थिक उन्नती साधते. यासाठी कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी असायला हवी. - श्याम कर्डिले, शेतकरी.

संत्र्यांच्या झाडांसाठी पाण्याचे नियोजन

दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विहीर आणि बोअरच्या पाणीपातळीमध्ये कमालीची घट होत असते. अशातच यंदा पावसाचे प्रमाणे कमी झाले आहे.

यंदा पाणी राखून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत घ्यावी लागणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उ‌द्भवणार आहे.

पाणीटंचाईची अडचण लक्षात घेत श्याम कर्डिले यांनी संत्र्याच्या बागासाठी पाण्याचे योग्य नियोजन केले आहे.

टॅग्स :फळेआॅरेंज फेस्टिव्हलफलोत्पादनशेतीशेतकरी