Join us

Dairy Business Story : ना शेती, ना कुठलं प्रशिक्षण, पण जिद्द मोठी, देवलाबाईंची दूध व्यवसायात भरारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:11 IST

Dairy Business Story : कुटुंबात शेतजमीन नसतानाही दुग्ध व्यवसायाच्या भरवशावर त्यांनी आर्थिक उन्नतीकडे वाटचाल सुरू केली आहे.

Dairy Business Story : कृषिप्रधान देशात महिला पूर्वीपासूनच शेती आणि शेतीपूरक व्यवसायात (Dairy Business) पुरुषाच्या बरोबरीने काम करीत आहेत. शेती नसतानासुद्धा दुग्ध व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या महिला विरळच; पण कोंढाळा येथील भूमिहीन देवला देवीदास ठाकरे यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

एका म्हशीपासून सुरू केलेल्या त्यांच्या दुग्ध व्यवसाय आता विस्तारला आहे. गत ११ वर्षात त्यांनी ११ म्हशी वाढविल्या, यशस्वीपणे त्या दुग्धव्यवसाय (Women Farming Success Story) सांभाळत आहेत.

देवलाबाई या भूमिहीन आहेत. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. ११ वर्षांपूर्वी त्यांनी भाकड म्हैस खरेदी केली. प्रजनानंतर एका म्हशीपासून अनेक म्हशी तयार झाल्या. सध्या त्यांच्याकडे ११ म्हशी व गायीसुद्धा आहेत. म्हशीचे दूध व दही देसाईगंसह गावखेड्यातच विक्री करण्यासाठी त्या नेत असत. आतासुद्धा त्या स्वतः हे काम करतात म्हशी व गार्थीचे संगोपन देवलाबाई व पती देवीदास हे करतात. त्यांच्या मेहनतीला फळ मिळत आहे. 

याच व्यवसायाच्या भरवशावर त्यांनी सहा खोल्यांचे घर बांधले आहे. दुग्ध व्यवसाय करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. परंतु या अडचणींवर त्यांनी मात केली. आपल्या गाव परिसरासह अनेक गावात दूध, दही, तूप विक्री करून देवलाबाई आपल्या संसाराचा गाडा चालवित आहेत. त्यांनी दुग्ध व्यवसायासाठी कुठलेही प्रशिक्षण घेतले नाही. केवळ अनुभवाच्या जोरावर त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे.

कोरोना काळात १६ किमी पायदळ प्रवास, दूध विक्रीकोरोना काळात लाँकडाऊन असताना दूध, दही विक्री करण्याचा प्रश्न होता. अशास्थितीत देवलाबाई दररोज डोक्यावर दह्याची कॅन घेऊन कोंढाळा गावापासून १६ किमी अंतरापर्यंत पायदळ प्रवास करीत असत. अत्यावश्यक सेवेचा लाभा घेत कठिण काळातही त्यांनी आपला व्यवसाय डळमळू दिला नाही.

सुविधा तोकड्या तरी सांभाळला व्यवसायदेवलाबाई ह्या कौटुंबिक जबाबदारी सांभाळून उत्तमरित्या व्यवसाय सांभाळत आहेत. देवलाबाई सकाळपासून रात्री उशिरापर्यंत म्हशींची देखभाल, चारापाणी करतात. दुग्ध व्यवसायाशिवाय आम्हाला पर्याय नाही. आम्ही जनावरेही विकू शकत नाही. अखरेच्या श्वासापर्यंत हा व्यवसाय करणार असल्याचे त्या आवर्जून सांगतात. सुविधा तोकड्या असतानाही त्यांनी अधिक मेहनत घेतली आणि प्रामाणिक कष्ट केल्याने या व्यवसायात त्या तग धरून आहेत. त्यांच्या मेहनतीबाबत गावपरिसरातील नागरिक तोंडभरून कौतुक करतात. 

दुधाळ गायींचेही संगोपन; संपूर्ण कुटुंब कामालादेवलाबाई यांच्याकडे ११ म्हशी आहेत. सोबतच त्यांच्याकडे गायी सुध्दा आहेत. गार्थीच्या माध्यमातून त्या दुग्ध व्यवसायाचा व्याप वाढवत आहेत. गायी व म्हशींच्या संगोपनाची जबाबदारी संपूर्ण कुटुंब सांभाळत असून सकाळपासूनच त्यांचे कार्य सुरू होते. कुटुंबात शेतजमीन नसतानाही दुग्ध व्यवसायाच्या भरवशावर त्यांनी आर्थिक उन्नतीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यांचा हा व्यवसाय इतरांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. गायी, म्हशींना कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये, यासाठी गोठा व्यवस्थापन त्या करतात. जनावरांची प्रकृती बिघडल्यास वेळीच पशुवैद्यकाचा सल्ला त्या घेतात. 

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधव्यवसायशेती क्षेत्रशेतीजागर "ती"चा