Join us

Success Story :शिक्षण फक्त १२वी, पण भाजीपाला शेतीत तरुणाने दाखवली मोठी कर्तबगारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 14:34 IST

Success Story: पारंपरिक धान पिकाला बगल देऊन नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले, त्याची यशकथा

भंडारा :भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील तरुण शेतकरी प्रकाश नंदलाल सार्वे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण झालेले असून ते अल्पभूधारक शेतकरी (farmer) आहेत. बाहेर नोकरीसाठी भयंकर स्पर्धा असल्यामुळे घरीच शेतीमध्ये व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यातून केवळ ३ महिन्यांत तब्बल ७ लाखांचे उत्पन्न मिळाले असून त्यामागे जवळपास २ लाख रुपये एवढा खर्च आला. 

लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील शेतकरी प्रकाश सार्वे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पारंपरिक धान पिकाऐवजी भाजीपाला (vegetable Farming) काढण्याचा व्यवसाय करीत असून त्यातून चांगली कमाई करीत आहे. विशेष म्हणजे वर्षभर नियमित तीन मजुरांना काम पण देत आहे. वडील पारंपरिक पद्धतीने भातपीक घ्यायचे. परंतु त्यातून खर्च वजा जाता फारसे उत्पन्न मिळत नसल्याने ते परवडत नसे. त्यामुळे पारंपरिक धान पिकाला बगल देऊन त्यातून नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भाजीपाला पिकांचे उत्पादन काढायचे ठरविले. 

दरम्यान या शेतकऱ्याने शेतीमध्ये पाण्याची सोय करून त्यात ठिबक सिंचनाची सोय केली. तसेच मल्चिंग पेपरचा वापर व ठिबकद्वारे औषधी दिली जाऊन यावर्षी उन्हाळ्यात २.५ एकरात कारले, भेंडी, काकडी व मिरची या पिकांची लागवड केली. शेतात पिकलेला माल भंडारा येथील बीटीबी मंडीमध्ये ठोक विक्री केला जाऊ लागली. तसेच गावाशेजारील बाजारांमध्ये स्वतः बसून भाजीपाला विकू लागला.

शेतीत मेहनतीतून पैसा.... 

आजची तरुण पिढी शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे म्हणून त्याकडे पाठ फिरवताना दिसते आणि जीवनाचे अर्धे उभार आयुष्य नोकरी मिळविण्यातच घालवितात. पण शेतीतून सोने पिकवू शकतो हे गोंडेगाव येथील तरुण शेतकरी प्रकाश सार्वे यांनी केवळ २.५ एकरात मेहनतीने भाजीपाला पिकवून अवघ्या ३ महिन्यांत तब्बल ७ लाखांचे उत्पन्न घेऊन प्रत्यक्ष सिद्ध करून दाखविले आहे.

टॅग्स :शेतीभाज्याभंडाराशेती क्षेत्र