Join us

काळ्या गव्हाचं वाण पेरलं अन् यशस्वीही झालं, नंदुरबार येथील शेतकऱ्याचा प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 19:58 IST

नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथील शेतकऱ्यानेही काळा गहू लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

नंदुरबार : पंजाबमधील मोहाली येथील राष्ट्रीय कृषी अन्न व जैवतंत्रज्ञान संस्थेने (नाबी) काळ्या गव्हाचे वाण विकसित केले आहे. हे वाण गेल्या दोन वर्षांपासून उत्तर भारतात पेरणी करून शेतकरी नफा कमावत आहेत. उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथील शेतकऱ्यानेही काळा गहू लागवडीचा प्रयोग यशस्वी केला असून, या गव्हाची येत्या १५ दिवसात कापणी होणार आहे. अर्धा एकरात पेरणी केलेला हा गहू शेतकऱ्याला एकरी सरासरी सहाशे किलोचे उत्पादन देणार आहे.

बाबूलाल सखाराम माळी (रा. काकदै) असे काळा गहू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. बाबूलाल माळी यांची काकर्दे शिवारात आठ एकर शेती आहे. या शेतीत दरवर्षी त्यांच्याकडून प्रयोग केले जातात. गत वर्षी त्यांना सातारा जिल्ह्यातील नागठाणे, जि. सातारा येथील शेतकरी संदीप जांभळे यांनी काळ्या गव्हाचे घेतल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर त्यांनी सातारा येथे नोकरीनिमित स्थायिक असलेल्या जावयाच्या मदतीने संदीप जांभळे यांच्याशी संपर्क करत, काळ्या गव्हाचे २० किलो बियाणे खरेदी केले होते. 

दरम्यान या बियाण्याची पेरणी त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये आपल्या अर्धा एकर क्षेत्रात केली होती. अर्धा एकरात केलेला हा गहू सध्या चार फुटांचा झाला असून, वाऱ्यावर डोलत आहे. येत्या १५ दिवसात या गव्हाची काढणी सुरू होणार आहे. साधारण ६०० किलो गहू उत्पादन येणार असल्याची माहिती शेतकरी माळी यांनी दिली आहे. शेतकरी बाबुलाल माळी म्हणाले की, काळ्या गव्हाची माहिती मिळाली होती. सामान्यपणे गहू लागवड करून पाणी दिले होते. १५ दिवसात गहू कापणी होणार आहे. हा गहू येत्या काळात येथील शेतकयांना वरदान ठरेल, शेतकऱ्यांनी गव्हाबाबत माहिती घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

सामान्य गव्हाच्या तुलनेत भाव जास्त

काळ्या गव्हाचा भावही सामान्य गव्हाच्या तुलनेत जास्त आहे. काळ्या गव्हामध्ये सामान्य गव्हापेक्षा ६० टक्के जास्त लोह असते. गव्हाचा काळा रंग त्यामध्ये असलेल्या अँथोसायनीन नावाच्या रंगद्रव्यामुळे होतो. या जातीमध्ये अँटिऑक्सिडंट घटक आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असता. नंदुरबार तालुक्यातील लागवडीचा हा प्रयोग यशस्वी झाला असून, शेतकरी माळी यांनी काळ्या गव्हासाठी रासायनिक खतांचा गरजेपुरता वापर आणि पाण्यावर संगोपन केले आहे. हा गहू बाजारात ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात असल्याची माहिती आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… 

टॅग्स :शेतीशेतकरीगहूनंदुरबार