Join us
Daily Top 2Weekly Top 5

केळी उत्पादक शेतकरी भावांची यशोगाथा, पहिल्यांदाच इराणला केळी निर्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 15:34 IST

सावखेडा येथील दोघा भावांनी चार एकरात पहिल्यांदाच लागवड केलेल्या केळीचे उत्पादन इराणला पोहोचले आहे.

शेतीत युवकांचा मोठा सहभाग दिसून येत असून शेतीत वेगेवगेळे प्रयोग करत युवक आर्थिक उन्नती साधत आहेत. नंदुरबारच्या दोन भावांनी केळी शेतीत कमाल करत इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. शहादा तालुक्यातील सावखेडा येथील दोघा भावांनी चार एकरात पहिल्यांदाच लागवड केलेल्या केळीचे उत्पादनइराणला पोहोचले आहे. दोघा शेतकऱ्यांचे काैतुक होत असून, पहिल्या प्रयत्नात दोघांनी निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेत नवीन आदर्श शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे.

जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते. अनेकजण केळी पिकावर प्रयोग करण्यावर भर दिला जात आहे. येथील केळी देखील देशासह बाहेर देशात निर्यात केली जात आहेत. सावखेडा येथील अर्जुन निंबा पवार व किरण पवार या दोघा भावांनी देखील इथली केळी सातासमुद्रापार पोहचवली आहेत. शहादा शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरील सावखेडा येथील पवार बंधूंनी पारंपरिक पिकांना फाटा देत फळशेतीला प्राधान्य दिले होते. यात त्यांनी प्रारंभीपासूनच निर्यातक्षम शेतीकडे वळण्याचे निश्चित केले होते.

पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करताना प्रामुख्याने कापूस, सोयाबीनसह कडधान्य पिके यांची लागवड करीत होते. त्यातून समाधानकारक उत्पादन मिळत असले तरी नवे प्रयोग करण्याच्या हेतूने त्यांनी केळी लागवडीसाठी प्रयत्न सुरू केले होते.  यात प्रारंभी अमोल भिका पाठक यांच्याकडून अद्ययावत माहिती मिळवली. लागवड, खत व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण आणि मार्केटिंग अशा प्रत्येक बाबी हळूहळू शिकून घेतल्या. पीक लागवडीनंतर केळी पिकाचे उत्तम नियोजन केल्यामुळे घडाची गुणवत्ता उत्तम मिळाली. 

भावही चांगला मिळाला... 

दरम्यान या दोन्ही भावांनी उत्पादित केलेली केळी एका खासगी कंपनीने बाजारभावापेक्षा प्रतिक्विंटल 2 रुपयांचा अधिक दर देत इराणकडे रवाना केली आहे. बॉक्स पॅकिंगमध्ये केळीचे घड टाकून ट्रकद्वारे दिल्ली ते इराण देशात विक्रीकरिता रवाना होत आहेत. अर्जुन पवार व किरण पवार या या दोन्ही भावांनी जाणकारांची मदत घेत सल्ल्यानुसार केळीचे निर्यातक्षम उत्पादन घेतले. दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या चार एकर क्षेत्रावर केळीच्या खोडांच्या लागवडीसाठी एकूण तीन लाख रुपयांचा खर्च केला आहे. यात त्यांनी उत्पादित केलेल्या केळीला 15 लाख रुपयांचा खरेदीदार मिळाला आहे. यातून त्यांचे नफ्याचे गणित पक्के झाले आहे. 

टॅग्स :नंदुरबारकेळीइराण