Join us

आधी भात शेती अन् आता गव्हाचा यशस्वी प्रयोग, नेमकं काय केलंय पहा!

By गोकुळ पवार | Published: February 03, 2024 4:59 PM

खरिपातील भात पिकानंतर जमिनीची मशागत न करता थेट एसआरटी (सगुणा) पद्धतीने केदार गव्हाची यशस्वी लागवड केली आहे. 

अनेक शेतकरीशेतीत नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय शेतीचा वापर वाढत आहे. त्याचबरोबर कमी जमिनीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्याने अनोखा प्रयोग केला आहे. खरिपातील भात पिकानंतर जमिनीची मशागत न करता रब्बी मानव चलीत टोकन यंत्राच्या सहाय्याने एक एकरमध्ये शून्य मशागत तंत्रज्ञान वापरून एसआरटी (सगुणा) पद्धतीने केदार गव्हाची यशस्वी लागवड केली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा भात लागवडीसाठी ओळखला जातो. इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. आता हळूहळू भात शेतीबरोबर बागायती शेती देखील केली जात आहे. यात टोमॅटोसह गहू, द्राक्ष आदी पिके घेतली जात आहेत. इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी बाजीराव एकनाथ नाठे यांनी अनोखा प्रयोग केला आहे. कमी श्रमात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी खरिपातील भात पिकानंतर जमिनीची मशागत न करता रब्बी मानव चलीत टोकन यंत्राच्या सहाय्याने एक एकरमध्ये शून्य मशागत तंत्रज्ञान वापरून एसआरटी पद्धतीने केदार गव्हाची यशस्वी लागवड केली आहे. 

दरम्यान नाठे यांनी एसआरटी पद्धतीने लागवडीसाठी कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे यांच्या नेरळ येथील सगुणा बागेला भेट दिली होती. येथील एसआरटी शेतीचा अनुभव गाठीशी बांधत स्वतःच्या शेतीत प्रयोग केला आहे. या शेतीमुळे जमिनीची सुपीकता वाढली असून सेंद्रिय कर्ब वाढला आहे. शून्य मशागत शेती तंत्र असून या शेतीसाठी भांडवल खर्च कमी येतो. मजुरही लागत नाही. जमिनीची नांगरणी केल्याने सूक्ष्म जिवाणू मरण पावतात, सुपीक माती वाहून जाते. तसेच जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. एसआरटी पद्धतीने नैसर्गिक रित्या गांडूळ वाढतात. यामुळे शेतकऱ्यांचे अधिक उत्पन्न वाढण्यास मोठी मदत मिळते. 

भात लागवडीनंतर आता गव्हाची लागवड 

विशेष म्हणजे ज्या शेतात त्यांनी आता गव्हाची लागवड केली आहे, त्या ठिकाणी एसआरटी पद्धतीने भात शेती केली होती. त्याच शेतीत त्यांनी एसआरटी पद्धतीने गव्हाची लागवड केली आहे. या केदार गव्हाचे 15 ते 20 क्विंटल उत्पन्न अपेक्षित असल्याचे नाठे यांनी सांगितले. शिवाय रब्बी हंगामात एसआरटी पद्धतीने भुईमूग, वाटाणे करतात. एसआरटी पद्धतीने शेती केल्यास एका वर्षात तीन पिके घेता येतात. शिवाय पाणी झिरपण्याची प्रक्रिया सुधारते, या शेतीवर ढगाळ हवामान, अवकाळी पावसाचा परिणाम होत नाही. येणारे धान्य माणसांसाठी, उरलेले पक्षांसाठी तर चारा जनावरांसाठी वापरता येतो. या अगोदर खरीप हंगामात एसआरटी पद्धतीने भातलागवड करीत त्यात विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले आहे. यामुळे त्यांना तालुका स्तरावर पीक स्पर्धेत कृषी विभागाकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… 

टॅग्स :शेतीइगतपुरीशेतकरी