Smart Farming : पारंपरिक शेतीला फाटा देत कमी क्षेत्रात, पाण्याचे व्यवस्थापन (Water Management) पा करून अधिक उत्पादन घेता येते, याचा प्रत्यय मोहारी येथील शेतकऱ्याने कृतीतून दिला आहे.
तीन एकरांत उन्हाळी धान पिकासह टोमॅटो, मिरची, तसेच अन्य भाजीपाला पिकाचे उत्पादन ते घेत आहेत. विशेष म्हणजे, भाजीपाला पिकासाठी ठिबक सिंचनाचा (Tibak Sinchan) वापर करीत असल्याने कमी पाण्याचा वापर करून ते अधिक उत्पादन घेत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli District) आरमोरी तालुक्याच्या मोहारी येथील ज्ञानेश्वर वनमाळी गुरनुले यांनी हा प्रयोग केला आहे. गुरनुले यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मध्यम जमिनीतून उत्पादन घेण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावरून टोमॅटो, मिरची लागवडीबाबत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी घेतली.
कमीत कमी पाण्यात उत्पादन घेण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा पर्याय निवडला. स्वमालकीच्या शेतात कृषी विभागाची मदत न घेता अँड्रॉइड मोबाइलच्या मदतीने सोशल मीडियावर भाजीपाला पिकांबद्दलची माहिती घेतली. ठिबक सिंचनाची सर्व यंत्रसामग्री ऑनलाइन मागविली.
५० हजारांची गुंतवणूक५० हजार रुपयांची गुंतवणूक करून मोहझरीसारख्या अतिदुर्गम भागात ठिबक सिंचनाचा वापर केला, टोमॅटो व मिरची पिकाला याद्वारे ते पाणी देत आहेत. टोमॅटोच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी कसदार जमीन योग्य असते. बाजारातील मागणी, लागवडीचा हंगाम, झाडांच्या वाढीचा प्रकार आणि पीक व्यवस्थापन या बाबी लक्षात घेऊन गुरनुले हे शेती कसत आहेत.
वर्षभर करता येते लागवडटोमॅटो पिकाची लागवड खरीप, रब्बी, आणि उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. टोमॅटोच्या फळांमध्ये 'ए' आणि 'सी'सारखी जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिटस असतात. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. शेतकरी गुरनुले हे वर्षभर भाजीपाला पीक घेतात.
ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पारंपरिक पद्धतीपेक्षा लागवड खर्च कमी आला, तसेच मजुरीवर जास्त खर्च झाला नाही. भाजीपाला पिकात पाण्याची बचत झाल्यामुळे धान पिकाला मुबलक पाणी देता येते. शासनाच्या कृषी योजनांचा लाभ होतकरू शेतकऱ्यांना मिळाला, तर निश्चितच भाजीपाला उत्पादन वाढवण्यास मदत होईल.- ज्ञानेश्वर वनमाळी गुरनुले, शेतकरी, मोहझरी