Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाख व्यवसाय करा, महिन्याला लाखो रुपये कमवा, भंडाऱ्याच्या पूर्णिमाचे नशीब बदललं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:28 IST

Agriculture News : लाख उत्पादनाच्या क्षेत्रात प्रवेश करून त्यांनी केवळ त्यांची आर्थिक स्थिती मजबूत केली नाही, तर....

- संजय साठवणे 

भंडारा :भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील धर्मपुरी कुंभली परिसरात पळस वृक्षांचे मोठे जंगल आहे. काही वर्षांपूर्वी साकोली येथील कृषी विज्ञान केंद्रातून (Krushi Vidnyan Kendra) मिळालेले लाख उत्पादन (Dink Production) प्रशिक्षण पुर्णिमाला आठवले. तेच कुशल काम हाती घेण्याचा धाडसी निर्णय पुर्णिमा यांनी घेतला. त्यांनी हार मानली नाही आणि लाख उत्पादनाचे काम वाढवून यश मिळवले. आज त्या अन्य महिलांसाठी प्रेरणा बनल्या आहेत.

प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक दृष्टिकोन राखला तर जीवनातील कठीण मार्गही सोपे होऊ प्र शकतात. याचे जिवंत उदाहरण धर्मपुरी (कुंभली) येथील पुर्णिमा राहुले यांनी त्यांच्या संघर्ष आणि आत्मविश्वासातून समाजासमोर मांडले आहे. पतीच्या निधनानंतर दोन मुलींचे संगोपन करणे आणि घर चालवणे ही कठीण जबाबदारी आणि कोणत्याही प्रकारचा आधार असूनही पूर्णिमा यांनी हिंमत हारली नाही. 

लाख उत्पादनाच्या क्षेत्रात प्रवेश करून त्यांनी केवळ त्यांची आर्थिक स्थिती मजबूत केली नाही, तर एक प्रेरणादायी उदाहरणही समाजासमोर ठेवले. भंडारा जिल्ह्यात असलेल्या समृद्ध वनसंपत्तीचा फायदा घेत पुर्णिमा राहुले यांनी लाख उत्पादनात विशेष प्रावीण्य मिळवले आणि यशाकडे वाटचाल केली. त्यांच्याकडे एकूण २.५ एकर जमीन आहे. ज्यामध्ये त्यांचे पती विलास राहुले पूर्वी भाजीपाला लागवड करायचे. सगळे काही ठीक चालले होते. २०२० मध्ये त्यांच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

घरातील जबाबदाऱ्या, मुलींचे शिक्षण आणि आर्थिक व्यवस्थापन यासारख्या जबाबदाऱ्यांचे मोठे ओझे अचानक पूर्णिमाच्या खांद्यावर आले. पूर्वी घरकामात व्यस्त असलेल्या पुर्णिमा यांना शेती आणि बाजारपेठेतील काम सोयीचे वाटले नाही. म्हणून, पुर्णीमाने त्यांच्या भातशेतीमध्ये पर्यायी व्यवस्था जोडण्याचा निर्णय घेतला. आज केवळ स्वावलंबी नाही तर दोन्ही मुलींच्या शिक्षणाकडेही पुर्णिमा पूर्णपणे लक्ष देत आहे. मोठी मुलगी ग्लोरी बी.एस्सी. आहे. ती शेतीचे शिक्षण घेत आहे आणि धाकटी मुलगी सुहानी नववीत शिकत आहे. मुलींना उच्च शिक्षण देणे हे त्यांचे ध्येय आहे.

कच्चा लाख गोंदियाच्या बाजारातपळस, बोर, आकाश मणी, पिंपळ या झाडांपासून लाख मिळते. लाख हा एक प्रकारचा डिंक आहे, जो मादी किटकांच्या स्रावापासून बनवला जातो. भारतात ८० टक्के लाख रंगिनी प्रजातीच्या किटकांपासून तयार होते. चाकू किंवा विळ्याच्या मदतीने फांद्यांमधून कच्चे लाख काढले जाते. १ क्विंटल लाख काढण्यासाठी अंदाजे ३ दिवस लागतात. दोन महिन्यांच्या उत्पादन कालावधीत ५ ते ७ क्विंटल उत्पादन शक्य आहे. बाजारात त्याची किंमत १०० ते ६०० रुपये प्रतिकिलो आहे. गोंदियाच्या बाजारात कच्चा लाख विकला जातो.

पुर्णिमा राहुले यांचा हा संघर्षमय यशस्वी प्रवास केवळ महिलांसाठी प्रेरणादायी नाही, तर ग्रामीण भागात पर्यायी व्यवसाय स्वीकारण्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.- डॉ. उषा डोंगरवार, कृषी विज्ञान केंद्र साकोली, जिल्हा भंडारा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीभंडाराशेतकरी