Join us

Womens Day 2024 : कौशल्य प्रशिक्षणातून उभारला व्यवसाय, संसाराबरोबरच आता उद्योगात भरारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 3:46 PM

घर, संसाराबरोबरच आता महिला वर्ग शेतीसह अन्य व्यवसायांकडे वळू लागला आहे.

नाशिक :  ग्रामीण भागातील महिलांना उद्योजकीय मानसिकतेपासून ते उद्योगातील नफ्या-तोट्याच्या गणितापर्यंतचे ज्ञान अवगत व्हावे व त्यांच्यातून उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी ‘सह्याद्री फार्म्स‘कडून प्रयत्न केले जात आहेत. संलग्न असलेल्या टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने प्रशिक्षण दिले जात आहे. नुकत्याच झालेल्या झालेल्या दहा दिवसीय महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणात 41 महिलांनी सहभाग घेत उद्योजकतेच्या वाटेवर पाऊल टाकले आहे. 

एकीकडे बदलत्या हवामानासह इतरही आव्हानांमुळे शेती अडचणींतून जात आहे. या परिस्थिती कुटुंबाचा आधार देण्यासाठी महिलांनी कंबर कसली आहे. घर, संसाराबरोबरच आता महिला वर्ग शेतीसह अन्य व्यवसायांकडे वळू लागला आहे. अनेक महिला वर्ग वेगवगेळ्या व्यवसायातून आर्थिक प्रगती साधत आहेत. सोलर ड्रायर, अन्न प्रक्रिया संबंधित प्रशिक्षणांना महिलांचा प्रतिसाद लक्षणीय आहे. या प्रशिक्षणांत उद्योजकीय मानसिकता विकसित करणे, यशस्वी उद्योजकांची वैशिष्ट्ये समजून घेणे, व्यवसाय सुरु करतांना काळजी घेणे, व्यवसाय बॅकींग आणि वित्त, नेतृत्व कौशल्ये आणि नफ्या तोट्याची गणिते या महत्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण संवादासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिले जात आहे.

महिलांमध्ये उपजत असलेल्या कौशल्यांचा विकास व्हावा व त्यांच्यातील उद्योजकता वाढावी, यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सोलर ड्रायरचे युनिट उभारणीचे सहकार्य करण्यात आले. हा उपक्रम केवळ महिलांना उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध करून देत नाही तर ग्रामीण भागातील अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या वाढीसही हातभार लावतो. या व्यतिरिक्त, महिला उद्योजकांना सर्वांगीण सहाय्य मिळावे, याकरिता कार्यक्रमात टाटा स्ट्राइव्ह, कलेक्टीव्हज फॉर इंटिग्रेटेड लाइव्हलीहूड इनिशिएटीव्ह (सिनी), बँकाचाही समावेश आहे.  या शिवाय, सह्याद्री फार्म्सने महिला उद्योजकांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे विपणन आणि विक्री सुलभ करण्यासाठी सक्रिय पावले उचलली आहेत, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनांसाठी एक व्यवहार्य बाजारपेठ निर्माण झाली आहे. 

सोलार ड्रायर यूनिटचे अर्थकारण

एकूण 12 लाख रुपयांचे सोलार ड्रायर यूनिट असून यामध्ये 35% प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) अनुदान, तर 15% सस्टेन प्लस - सिनी या संस्थांकडून मिळाले असून उर्वरित रक्कम शेतकरी सहभागातून दिली जाते. साधारणता: या उद्योगाद्वारे 40-50 लाखांची वार्षिक उलाढाल होते. तसेच यातून महिलांना मासिक उत्पन्न 25-30 हजार रुपये इतके मिळते. सह्याद्री फार्म्स तर्फे आतापर्यंत 35 सोलार ड्रायर यूनिटची उभारणी केली असून यामध्ये बेदाणा, मेथी, कांदा पात, स्ट्रॉबेरी, टोमॅटो आधी पिकांचे उत्पादन करून विक्री करण्यात येत आहे.

प्रशिक्षणातून व्यवसाय उभारणीला बळ 

मोहाडी येथील प्रशिक्षणार्थी सोनाली मनोज जाधव म्हणाल्या की, ‘‘माझे शिक्षण 12 वी पर्यंत झालेले असून या प्रशिक्षणाने माझ्यातील आत्मविश्‍वास वाढला आहे.  माझ्यातील क्षमतांची ओळख झाली आहे. या क्षमतांच्या बळावर मी नक्कीच उत्तम उद्योजिका बनू शकते. त्यानुसार या प्रशिक्षणातून व्यवसाय उभारणीला बळ मिळाले आहे. माझ्यासोबत अनेक महिला देखील यात सहभागी झाल्या असून त्या देखील घर, कुटुंबासोबत व्यवसाय सांभाळण्यास सज्ज झाल्या असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीनाशिकव्यवसायजागतिक महिला दिन