Join us

Peru Success Story : खडकाळ माळरानावर फुलवली तैवान पेरूंची बाग, नोकरीनंतर शेतीचा यशस्वी प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:48 IST

Peru Success Story : नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी फळबाग शेती फुलविली असून काळ्या आईच्या सेवेमध्ये ते मग्न आहेत. 

- अनिल अलगट 

नाशिक : नोकरी उत्तम की शेती असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. नाशिकच्या येवला तालुक्यातील (Yeola Taluka) ममदापूर येथील शेतकरी आप्पासाहेब वाघ यांनी गावालगतच्या खडकाळ माळरानावर पेरूची बाग फुलविली आहे. नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी फळबाग शेती फुलविली असून काळ्या आईच्या सेवेमध्ये ते मग्न आहेत. 

आप्पासाहेब वाघ हे मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे नोकरी करीत होते. त्यांनी २५ वर्षे झाडांची देखभाल व निगा राखण्याचे काम केले. निवृत्तीनंतर ते सध्या ममदापूर येथे राहत आहेत. आता त्यांनी गावाजवळ खरवडी रस्त्यावर खडकाळ रानावर तैवान पेरूची (Taiwan Peru) व सीताफळ लागवड केली आहे. पेरूच्या लागवडीतुन चांगला नफा मिळत असून पेरूंना परदेशात चांगली मागणी आहे. 

या बागेच्या चारही बाजूना त्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड (Fruit Farming) केली आहे. त्यात सफरचंद, जांभूळ, पपई, मोसंबी, नारळ, ड्रॅगनफ्रूट यांचा समावेश आहे. खडकाळ माळरानावर फुलविलेली फळबाग शेती पाहून डोळ्याचे पारणे फिटते. नोकरीपेक्षा शेतीच उत्तम असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांना एका वर्षात सहा ते सात लाखाचा नफा मिळाल्याचे त्यांची सांगितले. विहिरीचे पाणी व ठिबक सिंचनाचा वापर करून पेरूची बाग फुलवल्याचेही त्यांनी सांगितले.

झाडांचे संगोपन करणे हे माझ्या आवडीचे होते. मी फळबाग शेती साठी खेडेगावात आलो व यशस्वी झालो. इतर शेतकयांनी कमी पाण्यात जास्त उत्पन्नासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. शेतकऱ्यांनी एकच पीक न घेता पीक पद्धतीमध्ये बदल करून फळबाग शेतीकडे वळावे. - आप्पासाहेब वाघ, शेतकरी, ममदापूर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरी