नाशिक : खरं तर माहेरचा शेतीचा वारसा, लग्न झालं अन् राजकीय वारसा सुरू झाला. राजकीय काळात आरोग्य या विषयांत अधिकाधिक काम कसं होईल, हा दृष्टिकोन ठेवला. म्हणूनच शेतीतून आरोग्यासाठी काहीतरी करावं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दोन वर्ष काम केलं. अन् पॅशन फ्रुट शेतीचा प्रयोग केला. तो यशस्वीही करून दाखविला. ही कमाल करून दाखविणाऱ्या नाशिकच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे.
विजयश्री चुंबळे यांचे शिक्षण बॅचलर ऑफ कंप्युटर सायन्सपर्यंत झाले आहे. त्यांचे माहेर निफाड तालुक्यातील शिवडी. वडील मधुकर क्षीरसागर यांचा शेतीचा वारसा होताच. लग्न झाल्यांनतर सासरे केरूनाना चुंबळे यांनी राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. ग्रामपंचायत सदस्य ते नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षा, असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला.
सलग आठ-नऊ वर्षे राजकीय क्षेत्रात काम केल्यानंतर दरम्यानच्या काळात कोरोनामुळे सगळीच माध्यमे थांबली. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून त्यांनी विश्रांती घेत घरचा व्यवसाय सांभाळला. कोरोनात आरोग्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. अनेकजण आरोग्याबाबत सजग झाले. आरोग्यासाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या फळांना मागणी वाढली होती. त्यामुळे चुंबळे यांनी पॅशन फ्रुटची शेती करायचं ठरवलं. यासाठी विविध माध्यमातून दोन वर्षे अभ्यास केला.
सुरवातीला त्यांनी ऑनलाईन अकरा रोपे मागवली. मात्र ती रोपे काही जगू शकली नाही. पण त्या हरल्या नाहीत. पुन्हा नव्याने कर्नाटकातून सहा व्हरायटींची ३६ रोपांची ऑर्डर करत प्रायोगिक तत्वावर लागवड केली. घरासमोर असलेल्या एका गुंठा जागेत लागवड केली. यासाठी रोपे, लोखंडी खांब, तारीसाठी खर्च केला. जुन्या घराचे बांबू मंडपासाठी वापरले.
मंडप उभारण्यासाठी मजुरांची मदत घेतली. मात्र लागवडीपासून ते पुढे रोपांचे व्यवस्थापन, फवारणी हे त्यांनी स्वतःच केले. झाडांसाठी पूर्णतः सेंद्रिय खते वापरात आणली. ज्यामध्ये कोंबडी खत, लेंडी खत, निंबोळी अर्क आदींचा वापर केला. मागील वर्षी जून २०२४ ला लागवड केली होती. त्यानंतर सव्वा वर्षांनंतर फळे आली.
एका फळाचे अनेक फायदे विजयश्री यांनी सांगितले की, पॅशन फ्रूट हे मूळचे ब्राझिलियन फ्रुट असून आरोग्यासाठी उपयुक्त आहे. फळाचा आकार गोलाकार असतो आणि त्याची साल जाड आणि कठीण असते, तर आतमध्ये रसाळ, सुगंधी गर असतो. फळाचा रंग जांभळा किंवा पिवळा-नारिंगी असतो. या फळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने पचनास मदत होते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. पॅशन फ्रूटचा ज्यूसही उपयुक्त असून त्यांनी हा प्रयोगही केला आहे.
३१ झाडे चांगली वाढली. पहिल्यांदा फळ आल्यांनतर खूप आनंद झाला. महिलांनी शेती सारख्या माध्यमातून स्वतः सिद्ध केलं पाहिजे. कमी खर्चात, कमी जागेत अनेक व्यवसाय करता येतात. भविष्यात शेतीच्या माध्यमातून महिलांसाठी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. - विजयश्री चुंबळे, पॅशन फ्रुट उत्पादक शेतकरी
Web Summary : Vijayashree Chumbale, ex-council president, cultivates passion fruit in Nashik. Inspired by her agricultural heritage and health awareness, she successfully experimented with organic farming after initial setbacks, highlighting the fruit's health benefits and her vision for women in agriculture.
Web Summary : विजयश्री चुंबले, पूर्व परिषद अध्यक्ष, नासिक में पैशन फ्रूट की खेती करती हैं। अपनी कृषि विरासत और स्वास्थ्य जागरूकता से प्रेरित होकर, उन्होंने प्रारंभिक असफलताओं के बाद जैविक खेती के साथ सफलतापूर्वक प्रयोग किया, फल के स्वास्थ्य लाभों और कृषि में महिलाओं के लिए अपनी दृष्टि पर प्रकाश डाला।