Join us

Nursery Business : शिक्षण बारावी, आता नर्सरी व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:28 IST

Nursery Business : स्वतःच्या बेरोजगारीवरच मात करत आता पाच गावांतील ५० मजुरांना दररोजचा रोजगार पुरवत आहे.

- युवराज गोमासे 

भंडारा : मनात जिद्द, कठोर परिश्रमाची तयारी, कामात सातत्य ठेवले तर नक्कीच यशाचे शिखर गाठता येते. मोहाडी तालुक्यातील (Bhandara District) पालोरा येथील १२ वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राजू फुलचंद भोयर  या ध्येयवेड्या तरुणाने हाच मंत्र कानी ठेवला. त्याने स्वतःच्या बेरोजगारीवरच मात केली तर तो आता पाच गावांतील ५० मजुरांना दररोजचा रोजगार पुरविण्यात आहे.

राजू भोयर यांचा प्रारंभीचा काळ अतिशय खडतर राहीला. मजुरीसाठी त्याने नागपूर शहर गाठले. उद्यान कामावर मजुरी करताना त्याने त्या व्यवसायातील कौशल्य आत्मसात केले. मजुरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा या हेतूने त्याने भंडारा येथे फळ व फुलझाडे विक्रीचा व्यवसाय (Nursery Business) केला. त्यानंतर २०१४ मध्ये त्याने पालोरा येथील स्वतःच्या दीड एकर शेतीतफुलझाडांची नर्सरी सुरू केली. दहा वर्षात व्यवसाय वाढविला. आता तो ७ एकरात २५ लाख फळ व फुलझाडांची नर्सरी करीत असून विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगड, मध्य प्रदेश (Marathwada) राज्यात विक्री करीत आहे.

इनडोअर झाडांना पसंतीनर्सरीत इनडोअर सजावटीयोग्य झाडांची लागवड होत आहे. यात अॅग्लेनिया, अॅन्थेरियम, मनी प्लॉट, आर. के. पाम, बेंझोडीया, डीजी प्लॉट व अन्य प्रजातीच्या इनडोअर झाडांचा समावेश आहे.

फळ झाडांची लागवडसध्या नर्सरीत विविध प्रकारचे संकरित आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, पपई, अॅपल बोर, अनार, पेरू, पपई, सीताफळ, चेरी आदी फळझाडांची लागवड होत आहे.

आउटडोर व उद्यान झाडेआउटडोअर झाडांमध्ये क्रोटॉन, विद्या, जुनीफर, पामचे विविध प्रकार, ड्रेसिना, जुनीफर, सायकस, गोल्डन सायप्रस, कॅकटस आदींचा समावेश आहे. उद्यानांसाठी रॉयल पाम, होस्टेल पाम, एरिक पाम, क्रोटॉन, डायमंड लॉन, सिलेक्शन लॉन आर्दीचा समावेश आहे.

विविध प्रजातींची ५० फुलझाडेराजू भोयर यांच्या नर्सरीत सध्या ५० प्रकारची फुलझाडांची लागवड होऊन विक्री केली जाते. यात २० प्रकारचे गुलाब, १५ प्रकारचे जास्वंद, जाई, जुई, चमेली, मोगरा, निशिगंधा, चाफा, लिली, मधुमालती व अन्य फुलझाडांचा समावेश आहे.

व्यवसायातील वार्षिक ताळेबंदनर्सरीच्या व्यवसायातून वार्षिक ४८ ते ५० लाखांची उलाढाल होत आहे. नर्सरी व्यवस्थापन तसेच फळ व फुलझाडांची लागवड, मजुरी, खत, कीटकनाशक, औषधी आदींवर ३५ ते ४० लाखांचा खर्च होतो. वार्षिक ८ ते ९ लाखांचा शुद्ध नफा मिळत असल्याची कबुली राजू भोयर यांनी दिली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी यशोगाथाकृषी योजनाशेती