- भूपेंद्र मराठे जळगाव : पारोळा तालुक्यातील राजवड येथील शेतात 'कुंकू' (सिंदूर) रोपांची यशस्वी (Sindoor Farming) लागवड करून माजी आमदार व कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी कृषी क्षेत्रात आगळावेगळा प्रयोग यशस्वी केला आहे.
त्यांनी त्यांच्या राज फार्मवर १५ ऑगस्ट २०२३ रोजी सिंदूरच्या ३५ रोपांची लागवड केली होती. साधारणपणे 'सिंदूर' (नैसर्गिक कुंकू उत्पादन देणारे सिंदूर नावाचे झाड) लागवडीच्या दिवसापासून ३ वर्षाचा कालावधी लागतो. परंतु लागवड केल्यापासून अवघ्या १५ महिन्यांतच प्रतिवृक्ष १ किलो याप्रमाणे ३५ किलो "सिंदूर"चे उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
"सिंदूर" च्या झाडावर लालसर रंगाची फळे येतात. फळे कोरडी झाल्यावर बिया काढल्या जातात. या बिया नैसर्गिकरीत्या गडद लालसर रंगाच्या असतात. या बियांमध्ये नैसर्गिक रंगद्रव्य असते. बियांना सावलीत सुकवून नंतर बारीक दळून लालसर पावडर तयार केली जाते. हीच पावडर कुंकू म्हणून वापरली जाते.
कमी खर्चाचे उत्पादन...एका एकरात ४३५ सिंदूर रोपांची लागवड केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे एक झाड ५० किलोपर्यंत सिंदूर देऊ शकते. यासाठी ठिबकद्वारे अत्यंत कमी पाणी लागते. याकरिता कुठलेही फवारणी किंवा खत द्यावे लागत नाही. शेतकरी आंतरपीक म्हणूनही घेऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोडपीक म्हणून सिंदूरची लागवड करावी, असे साहेबराव पाटील यांनी सांगितले.
राजवड येथील शेतात १५ ऑगस्ट २०२३ रोजी सिंदूर रोपांची लागवड केली होती. सिंदूरमधून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.- साहेबराव पाटील, माजी आमदार.
सिंदूर वनस्पती, ज्याला वैज्ञानिक नाव बिक्सा ऑरेलॉना असे आहे, ही एक बारमाही झुडुप किंवा लहान वृक्ष आहे. या प्रक्रियेतून तयार झालेले कुंकू पूर्णपणे नैसर्गिक आणि बिनविषारी असते. याचा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्येही केला जातो.- जयेश साळवे, विभागप्रमुख, वनस्पती शास्त्र, प्रताप महाविद्यालयात, अमळनेर.