Join us

MPSC Success Story : अल्पभूधारक शेतकऱ्याची लेक झाली उपविभागीय कृषी अधिकारी, वाचा यशोगाथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 17:35 IST

MPSC Success Story : शेतकरी कन्येने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा गड सर करीत उपविभागीय कृषी अधिकारी पदापर्यंत मजल गाठली आहे.

गोंदिया : जग हे रडणाऱ्यांचे नाही तर लढणाऱ्यांचे आहे, असे म्हटले जाते. याच आशावादातून परिस्थितीशी दोन हात करीत एका अल्पभूधारक शेतकरी कन्येने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) गड सर करीत उपविभागीय कृषी अधिकारी पदापर्यंत मजल गाठली आहे. कविता दिगंबर हरिणखेडे (Kavita Hirankhede) असे या लढवय्या तरुणीचे नाव आहे.

कविता हरिणखेडे ही गोंदिया जिल्ह्यातील (Gondiya) तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथील रहिवासी आहे. कविताचे वडील शेती करतात. या कुटुंबीयांकडे अवघी पाच एकर शेती आहे. त्यामध्ये या भागातील मुख्य पीक धान (Paddy Farming) घेतले जाते. कवितासह कुटुंबात तिच्या दोन बहिणी असून, त्यांचे लग्न झालेले आहे. घरच्या परिस्थितीची जाण असलेल्या कविता यांनी नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१६ ते २०१८ या कालावधीत नागपूर कृषी महाविद्यालयातून बीएससी (ॲग्री) आणि एमएससी (ॲग्री) हे २०२१ या वर्षात अकोला कृषी महाविद्यालयातून पूर्ण केले. 

अकोला (Akola) येथे शिक्षण घेत असताना कविता यांची पावले कृषी विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा फोरमकडे वळली. कोणतीही शिकवणी न लावता याच ठिकाणी तासनतास अभ्यासाला बसत त्यांनी परीक्षेची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून परिस्थितीला दाेष देत निव्वळ रडत बसणाऱ्यांसमोर कविताने आदर्श निर्माण केला आहे.

नुकताच स्वीकारला प्रभार

अल्पभूधारक कुटुंबातील कविता हरिणखेडे यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा देत ती उत्तीर्ण केली. त्याआधारे त्यांची नियुक्ती वरोरा (चंद्रपूर) उपविभागीय कृषी अधिकारीपदी करण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात त्यांनी आपला प्रभार स्वीकारला. पहिल्या टप्प्यात कामकाज शिकण्यावर भर देत त्यानंतरच्या काळात कृषिपूरक योजनांच्या प्रसारावर भर देणार असल्याचे कविता यांनी सांगितले. सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे घरची परिस्थिती बेताची होती. त्याची जाण ठेवली, त्यामुळे पुढील बाबी सोप्या झाल्या.

माझे संपूर्ण शिक्षण जिल्हा परिषद शाळा, नवोदय विद्यालय तसेच शासकीय कृषी महाविद्यालयातून झाले आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अकोला कृषी विद्यापीठातील स्टडी फोरमची फार मदत झाली.- कविता हरिणखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी

टॅग्स :एमपीएससी परीक्षाशेती क्षेत्रशेतीगोंदिया