Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mango Farming Success Story : पाच एकरात आंब्याची क्रांती; सुरेश ठाकूर यांची १२ लाखांची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:40 IST

Mango Farming Success Story : नोकरीच्या मागे न लागता शेतीची वाट निवडणाऱ्या तरुणाने आंबा बागायतीतून तब्बल १२ लाखांचे उत्पन्न मिळवत सर्वांना चकित केले आहे. कमी खर्च, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीतूनही मोठा नफा मिळवता येतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे.(Mango Farming Success Story)

विश्वास साळुंके

पारंपरिक शेतीतून मर्यादित उत्पन्न मिळत असताना, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळवता येते, हे दांडेगाव (ता. कळमनुरी) येथील तरुण शेतकरी सुरेश चंदनसिंग ठाकूर यांनी सिद्ध करून दाखवले आहे. (Mango Farming Success Story)

बी.एस्सी ॲग्रीचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीतच करिअर घडवण्याचा निर्णय घेतला आणि आज ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.(Mango Farming Success Story)

सुरुवात छोटी, यश मोठे

सुरेश ठाकूर यांनी २०१२ मध्ये केवळ ५० रुपये प्रति रोप या दराने ३०० केशर आंब्याची झाडे लावून बागायतीची सुरुवात केली.

अवघ्या तीन वर्षांत म्हणजे २०१५ मध्ये त्यांना सुमारे १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. या यशामुळे त्यांनी बाग वाढवण्याचा निर्णय घेतला.

स्वतः ची नर्सरी, कमी खर्चात मोठी बाग

२०१५ मध्ये त्यांनी आणखी ४०० आंब्याची झाडे लावली. विशेष म्हणजे ही सर्व रोपे त्यांनी स्वतः च्या नर्सरीमध्ये कलम करून तयार केली. त्यामुळे खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला. आज त्यांच्या पाच एकर क्षेत्रात सुमारे ७०० आंब्याची झाडे आहेत.

परागीभवनासाठी गावरान झाडांचा वापर

उत्पादन वाढीसाठी त्यांनी ५ टक्के गावरान आंब्याच्या जाती जसे लोणच्याचा आंबा आणि जुने गोड आंबे लावले. यामुळे परागीभवन सुधारले आणि उत्पादनातही वाढ झाली.

उत्पन्नात सातत्याने वाढ

२०१८ मध्ये या बागेतून त्यांना ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदा मात्र त्यांनी विक्रमी कामगिरी करत मोहोर अवस्थेतच संपूर्ण बाग व्यापाऱ्याला विकली आणि तब्बल १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.

खर्च व नफा

या बागेच्या व्यवस्थापनासाठी साधारणपणे १.५ लाख रुपये खर्च येतो. यंदा बदलत्या हवामानामुळे खर्च वाढून सुमारे २ लाख रुपये झाला. तरीही त्यांना सुमारे १० लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला.

जोखीम टाळण्यासाठी घेतला निर्णय

अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेता त्यांनी मोहोर अवस्थेतच बाग विकण्याचा निर्णय घेतला. 

जर त्यांनी स्वतः फळ विक्री केली असती, तर १५ ते १८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले असते; मात्र जोखीम टाळण्यासाठी त्यांनी सुरक्षित पर्याय निवडला.

इतर शेतकऱ्यांसाठी संदेश

“किमान पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी किमान १०० आंब्याची झाडे लावावीत. कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या योजनांचा लाभ घेतल्यास उत्पन्नात निश्चित वाढ होते,” असा सल्ला सुरेश ठाकूर देतात.

मार्गदर्शनाचा मोठा वाटा

कृषी विभाग कळमनुरी आणि कृषी विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून त्यांनी उत्पादन वाढवले.

नियोजन, मेहनत आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेतीतूनही नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवता येते, हे सुरेश ठाकूर यांच्या यशोगाथेतून स्पष्ट होते. त्यांच्या या यशामुळे परिसरातील अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळण्याची प्रेरणा घेत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Organic Farming : उत्पादन वाढीचा फॉर्म्युला सापडला? शेतकरी शेणखतावर भर देतायत

अधिक वाचा : Reshim Sheti : पारंपरिक शेतीला पर्याय सापडला; 'या' पिकातून मोठी कमाई

English
हिंदी सारांश
Web Title : Mango Farming Success: Suresh Thakur Earns ₹12 Lakh on Five Acres

Web Summary : Farmer Suresh Thakur, a B.Sc. Agri graduate, achieved mango farming success in DandeGaon. Starting with 300 trees, he expanded to 700 on five acres, earning ₹12 lakhs by selling his crop pre-harvest, showcasing modern techniques and planning for high yields.
टॅग्स :शेती क्षेत्रआंबाशेतकरीशेती