Join us

Inspiring Farming Story : 85 वर्षांची आजी आजही कसते शेती; विषमुक्त शेतीतून नवा आदर्श, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 20:33 IST

Inspiring Farming Story : पण, ती हरली नाही. ती शिवारात जीव ओतत गेली. रक्ताचं पाणी करत राहिली आणि 'विष'मुक्त शेतीचं स्वप्न पूर्ण करीत गेली.

जळगाव : जन्मजात नादारी पूजलेली म्हणून बालवयातच शिवाराला जुंपली गेलेली. शाळेची वाट नव्हतीच नशिबात. म्हणून सार्वे (धरणगाव) ची ही लेक चिंचपुरा येथील सासर घरीही शेतमाया (Farming) जपत गेली. ऐन संसार बहरत असताना नियतीने कपाळावरचा कुंकू पुसला. 'कारभारी'चा भार तिच्या ओंजळीत टाकला.

पण, ती हरली नाही. ती शिवारात जीव ओतत गेली. रक्ताचं पाणी करत राहिली आणि 'विष'मुक्त शेतीचं स्वप्न पूर्ण करीत गेली. वयाची पंच्याऐंशी गाठलेली ही 'माय' जेव्हा सेंद्रिय पिकात रमलेली दिसली, तेव्हा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधकांची यंत्रणा तिच्यापुढे नतमस्तकच होऊन गेली.

चिंचपुरा (धरणगाव) येथील वैजंताबाई बडघू पाटील यांचा दिनक्रम ठरलेला आहे. सकाळी ८ वाजता त्या मजुरांसोबत कामाला निघतात. दुपारी तीन वाजेला घरी परततात. मग निवांत झाल्यावर सेंद्रिय धान्याला पाखडत बसतात. १९८१ मध्ये पती बडघू पाटील यांचे निधन झाले. तेव्हा त्यांच्यासह लेकरांचे भविष्य अंधारमय झाले. मात्र शेतशिवाराची कामे वैजंताबाई यांनी स्वतः हातात घेतली. नामदेव आणि मधुकर नावाची दोन्ही लेकरं त्यांच्या सोबतीला आले आणि शिवाराला फुलवित गेले.

...अन् जागलं 'माय'मनरासायनिक खतांचा वाढता वापर आरोग्याशी जीवघेणा खेळ करतोय, याची वैजंताबाईना जाणीव झाली. तेव्हा लोकांना 'विष' खाऊ घालतोय म्हणून त्या स्वतःलाच कोसत गेल्या. त्यांनी दोन्ही लेकरांपाशी सेंद्रिय शेतीचा पर्याय ठेवला. लेकरांनीही 'माय' इच्छेला होकार भरला आणि सारं शिवार 'विष' मुक्त करायला निघाले. तीळ, मूग, उडीद, दादर, गहू, भुईमुगाची शेती सेंद्रिय पद्धतीने करीत असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना मिळाली. तेही वैजंताबाईच्या शिवारात दाखल झाले. वयाच्या 'पंच्याऐंशी 'तही त्या सात्विक धान्य पिकविताहेत, ते पाहून तेही नतमस्तकच झाले.

वयाच्या १२ वर्षांपासून आई शेती करतेय. तिच्या मेहनतीला पाहून आम्हालाही ऊर्जाच मिळते. शेतीचा विस्तार झाला. पण, आईच्या शब्दाला जागण्यासाठीच गेल्या १० वर्षांपासून सेंद्रिय पिकांची लागवड सुरु ठेवली आहे. 'विष'मुक्त धान्य पिकविल्याचे नक्कीच समाधान आहे.- नामदेव पाटील, चिंचपुरा

टॅग्स :जागर "ती"चाशेतकरी यशोगाथाशेती क्षेत्रसेंद्रिय शेतीजळगाव