- साईनाथ कुचनकार चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील तुळशी हे छोटेसे गाव. आज महिलांच्या उद्योगशीलतेमुळे गाव चर्चेत आले आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता स्वतःचे उद्योग उभे करत कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे. याच गावातील अर्चना गजानन तुराणकर यांनी नैसर्गिक मध विक्रीतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गेल्या आठ वर्षांपासून त्या मध गोळा करून विक्री करीत आहेत. सातत्य, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर त्यांनी वर्षाला ६ ते ७ क्विंटल मध विक्रीपर्यंत मजल मारली आहे. या व्यवसायातून त्यांना सुमारे ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. खर्च वगळता, जवळपास २ लाख रुपये निव्वळ नफा मिळत असून, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
त्यांच्या या कमाईमुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना अभियांत्रिकी शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. तुळशी गावाला लाभलेले जंगल व नदीचे नैसर्गिक वातावरण मधमाशी पालनासाठी अनुकूल आहे. परिसरातील आदिवासी समाज परंपरेने मध गोळा करतो. अर्चना तुराणकर या त्यांच्याकडून मध घेऊन सुती कापडाने गाळून शुद्ध स्वरूपात विक्री करतात. त्या गावकऱ्यांना मधमाशांच्या पोळ्यातून मध शास्त्रीय पद्धतीने गोळा कसे करायचे, याचे मार्गदर्शनही करतात.
त्यांच्या या प्रवासात त्यांचे भाऊ विकास क्षीरसागर यांनी दिलेले मधमाशी पालनाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तसेच 'उमेद' अभियानामुळे त्यांना मोठा व्यासपीठ मिळाले. मुंबई, नागपूर, चंद्रपूर येथे भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना ग्राहक वर्ग वाढवता आला आणि त्यांच्या उत्पादनाला प्रसिद्धी मिळाली. आज त्या प्रति किलो ६०० रुपये दराने मध विकतात आणि स्वतःचा ब्रँड तयार केला आहे. "दुर्गा महिला स्वयंसाहाय्यता समूह" या बचत गटाच्या माध्यमातून इतर महिलाही विविध व्यवसाय करत आहेत.
शेतीला पूरक व्यवसायशेती हा त्यांचा मूळ व्यवसाय असून, पती व मुलांचे त्यांना पूर्ण सहकार्य मिळते. भविष्यात स्वतःच्या शेतात मधमाशी पेट्या लावून उत्पादन वाढविण्याचा त्यांचा मानस आहे. मधमाशी पालनामुळे केवळ मध उत्पादनच नव्हे, तर शेतीतील उत्पादन वाढीसही मदत होते, असे त्या सांगतात.
मध व्यवसायाची झटपट माहितीअर्चना तुराणकर या गेल्या ८ वर्षांपासून मध व्यवसाय करीत आहेत. वर्षाला सुमारे ६ ते ७ क्विंटल मध उत्पादन होऊन जवळपास ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. खर्च वगळता, बऱ्यापैकी त्यांना नफा मिळत आहे. बचत गटामुळे त्यांना बऱ्यापैकी फायदा झाला आहे.
पुढील वाटचालअर्चना तुराणकर यांची पुढील योजना म्हणजे स्वतःच्या शेतात मधमाशी पेट्या बसविणे. यामुळे मथ उत्पादन वाढेल, तसेच शेती उत्पादनालाही फायदा होईल. यासोबतच इतर महिलांना मार्गदर्शन करून अधिक महिलांना स्वावलंबी बनविण्याचा त्यांचा मानस आहे.
Web Summary : Archana Turankar earns ₹2 lakh profit annually from her honey business in Tulshi, Chandrapur. She empowers women, provides training, and sells honey at ₹600/kg, supported by the Umed campaign and family.
Web Summary : अर्चना तुरणकर चंद्रपुर के तुलसी में अपने शहद व्यवसाय से सालाना ₹2 लाख का लाभ कमाती हैं। वह महिलाओं को सशक्त बनाती हैं, प्रशिक्षण देती हैं, और ₹600/किलो पर शहद बेचती हैं, जिसे उमेड अभियान और परिवार का समर्थन प्राप्त है।