- रामदास बोरकर गोंदिया - भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. त्यामुळे धानाचे कोठार अशी या जिल्ह्यांची ओळख आहे. पण, हळूहळू धानाच्या शेतीचा वाढता लागवड खर्च, कमी होत चाललेली उत्पादकता, परिणामी होणारा तोटा यामुळे धान उत्पादक शेतकरी आता पारंपरिक धान शेतीला फाटा देत इतर पिकांच्या लागवडीकडे वळत आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महिला शेतकरी विजया कापगते यांनी शेतीला आधुनिकतेची जोड देत तब्बल १५ एकरवर हरभरा लागवड करून तब्बल १३५ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
कापगते परिवाराकडे सलग १५ एकर शेतजमीन आहे. यावर्षी त्यांनी या संपूर्ण जमिनीवर केवळ हरभरा पेरण्याचा धाडसी निर्णय घेतला. जिल्ह्यात सलग १५ एकरावर हरभऱ्याची लागवड करणारा हा एकमेव परिवार असावा. योग्य नियोजन, खतांचा संतुलित वापर आणि वेळेवर पाणी व्यवस्थापन यामुळे त्यांना यावर्षी त्यांनी उत्पन्न घेतले.
विजया कापगते यांनी त्यांची शेतीशी नाळ कशी जुळली हे सागतांना लग्नानंतर १९८५ मध्ये मी या घरात आले आणि तेव्हापासून शेतीशी माझे नाते जोडले गेले. सुरुवातीला सर्व काही पारंपरिक होते. पण, काळाची पावले ओळखून शेतीत बदल करणे गरजेचे होते. १९८५ पासून आजतागायत, त्यांनी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतीचे बारकावे समजून घेतले. त्यांच्या निधनानंतर खचून न जाता, त्यांनी सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली.
आजही शेतातील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये त्यांचा सहभाग असतो. बियाणे निवडण्यापासून ते बाजारपेठेत माल नेईपर्यंत, त्यांच्या अनुभवाचा फायदा कुटुंबाला होतो. एका महिला शेतकऱ्याने कष्टाने आणि जिद्दीने शेती कशी करावी, याचा त्या उत्तम उदाहरण आहेत. यंत्राचा वापर केल्याशिवाय शेती परवडणारी नाही.
म्हणूनच आम्ही पारंपरिक पद्धतीत बदल करून संपूर्ण १५ एकर शेतीचे 'लँड लेवलिंग' केल्याचे गिरीधारी कापगते सांगतात. वडिलांचा वारसा पुढे नेताना शेतीमध्ये मोठे तांत्रिक बदल केले. संपूर्ण शेतातील आडवे-उभे धुरे काढून टाकून शेतजमीन सपाट केली, ज्यामुळे ट्रॅक्टर आणि इतर यंत्रे वापरणे सोपे झाले. हरभऱ्याच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत आणि अगदी मळणीपर्यंत त्यांनी आधुनिक यंत्रांचा वापर केला. यामुळे वेळेची आणि मजुरीची मोठी बचत झाली. मळणी यंत्राच्या साहाय्याने शेतावरच हरभऱ्याचे दाणे आणि कुटार वेगळे केले जाते.
फळबागांची केली लागवडकेवळ धान, हरभार पीक घेण्यावरच न थांबता, कापगते परिवाराने शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यपालन आणि फळबागेची निर्मिती केली आहे. त्यांनी शेतातील तीन एकर जागेवर एक अद्ययावत मत्स्यतलाव तयार केला आहे. या तलावामध्ये 'आंबे मासे' (एका विशिष्ट प्रकारची माशांची जात) चे संवर्धन केले जाते.
या तलावाच्या सभोवताली आणि पाण्याची टाकी असलेल्या तीन एकर क्षेत्रात आंब्याची बाग लावण्यात आली आहे. या आंब्याच्या झाडांसोबतच त्यांनी फणसाचीही काही झाडे लावली आहेत. यामुळे त्यांना केवळ पिकांमधूनच नाही, तर मासे आणि फळांमधूनही अतिरिक्त आणि शाश्वत उत्पन्न मिळते.
Web Summary : Vijaya Kapgate, a farmer from Arjuni Morgaon, achieved a record 135 quintal harbhara yield on 15 acres through modern techniques. She embraced technology, optimized resources, and diversified into fish farming and orchards, showcasing resilience and innovation in agriculture after her husband's death.
Web Summary : अर्जुनी मोरगांव की किसान विजया कापगते ने आधुनिक तकनीकों से 15 एकड़ में 135 क्विंटल चना की रिकॉर्ड पैदावार हासिल की। उन्होंने प्रौद्योगिकी को अपनाया, संसाधनों का अनुकूलन किया, और मछली पालन और बागों में विविधता लाई, अपने पति की मृत्यु के बाद कृषि में लचीलापन और नवाचार का प्रदर्शन किया।