Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोहुफुलांच्या लाडूची किमया, 50 किलो लाडूसाठी 32 हजारांचा खर्च, 50 हजारांचे उत्पन्न, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 18:35 IST

Mohful Ladu : 'मोहफूल लाडू' (Mohaphul Laddu) या उद्योगातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हिंगोली :  हवामानातील अनिश्चितता आणि शेतीतील वाढता खर्च यामुळे अनेक छोटे शेतकरी अडचणीत सापडले असताना, हिंगोली जिल्ह्यातील दांडेगाव येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र नवा मार्ग निवडला आहे. महदजी शिरडकर यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आयुर्वेदिक मूल्यवर्धित उत्पादनांच्या क्षेत्रात पाऊल टाकले असून, 'मोहफूल लाडू' (Mohaphul Laddu) या उद्योगातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

संकटातून संधीचा शोध
महदजी शिरडकर हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांची शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून होती. अनियमित पाऊस, दुष्काळ आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे त्यांना सतत आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत होता. केवळ पारंपारिक शेतीवर कुटुंब चालवणे कठीण असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पर्यायी रोजगाराचा शोध सुरू केला.

केरळमध्ये घेतले प्रशिक्षण
आरोग्यदायी आणि नैसर्गिक उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी आयुर्वेदिक खाद्यपदार्थांच्या निर्मितीचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी केरळ येथे जाऊन 'आयुर्वेदिक पंचकर्म' विषयाचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणातून त्यांना आयुर्वेदिक अन्नप्रक्रिया, औषधी वनस्पतींचे महत्त्व आणि गुणवत्तेचे निकष समजले.

कृषी विज्ञान केंद्राचे (KVK) सहकार्य
केरळहून परतल्यानंतर त्यांनी हिंगोली येथील कृषी विज्ञान केंद्राशी (KVK) संपर्क साधला. येथील तज्ज्ञांनी त्यांना मोहफूल लाडू तयार करण्याचे तंत्रज्ञान, घटक निवडीचे प्रमाण, हायजिनिक पॅकेजिंग आणि विपणन (Marketing) कौशल्ये यांचे सखोल प्रशिक्षण दिले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी व्यावसायिक स्तरावर उत्पादन सुरू केले.

आर्थिक गणितात मोठी सुधारणा
महादजी यांनी ५० किलो लाडूंच्या पहिल्या बॅचपासून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. या बॅचचा खर्च आणि नफ्याचे गणित खालीलप्रमाणे राहिले :

एकूण उत्पादन खर्च - ३२ हजार रुपये 
एकूण विक्री उत्पन्न - ५० हजार रुपये 
निव्वळ नफा - १८ हजार रुपये 

पारंपारिक शेतीच्या तुलनेत हा नफा अत्यंत समाधानकारक असल्याने त्यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचे हे लाडू स्थानिक बाजारपेठांसह आयुर्वेदिक दुकाने आणि प्रदर्शनांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत.

गावातील तरुणांसाठी ठरले प्रेरणास्थान*
महादजी यांच्या या यशामुळे दांडेगाव परिसरातील ग्रामस्थांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. शेतीमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास आर्थिक स्थैर्य मिळू शकते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. सध्या ते कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत असून, एक 'रोल मॉडेल' म्हणून समोर आले आहेत.

"केवळ कष्टावर अवलंबून न राहता, वैज्ञानिक प्रशिक्षण आणि बाजारपेठेचा अभ्यास केला, तर ग्रामीण भागातही यशस्वी उद्योग उभा राहू शकतो," असा संदेश महादजी शिरडकर यांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahua flower laddu success: Low cost, high profit farming.

Web Summary : Hingoli farmer Mahadji Shiradkar found success with Mahua flower laddus. Training and KVK support helped him earn ₹18,000 profit from a ₹32,000 investment. He inspires local farmers.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरी यशोगाथाकृषी योजना