- प्रदीप बोडणे
गडचिरोली : आपल्या वाट्याला जे दुःख, कष्ट आले ते आपल्या मुलाच्या नशिबात येऊ नये म्हणून देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील मोतीलाल विठ्ठल दोनाडकर यांनी रक्ताचे पाणी केले. एक एकर शेतीला दुधाच्या जोडधंदा (Milk Business) होता. त्याच्या भरवशावर मुलाला चांगले शिक्षण दिले. आज मुलगा मनोज हा अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे पशुधन विकास अधिकारी श्रेणी-१ पदावर कार्यरत आहे. 'फादर्स डे'च्या निमित्ताने मोतीलाल दोनाडकर यांनी केलेल्या संघर्षाची दखल घ्यावीच लागेल.
देसाईगंज तालुक्यातील कोकडी हे छोटेसे गाव. मोतीलाल दोनाडकर यांच्याकडे एक एकर शेती आहे. एका एकर शेतीच्या भरवशावर कुटुंबाचे भागत नसल्याने त्यांनी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. शेती व दुधाच्या व्यवसायावर कुटुंबाचा खर्च भागत होता. शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस तोट्याचा सौदा बनत चालला आहे.
त्यामुळे कोणताच पालक आपल्या पाल्याला शेती करायला लावत नाही. त्याने शासकीय नोकरी करावी किंवा एखादा उद्योग करावा, अशीच अपेक्षा असते. तीच अपेक्षा मोतीलाल दोनाडकर यांची होती. त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन करीत मुलगा मनोज याला उच्च शिक्षण दिले. मनोजलाही वडील करीत असलेल्या कष्टाची जाणीव होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यात त्याची पशुधन विकास अधिकारी पदावर निवड झाली.
आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान शेतीत राबराब राबणाऱ्या मोतीलाल दोनाडकर यांना आहे. मुलाला नोकरी लागल्यानंतर अनेक पालक मुलासोबत शहरात जातात. मात्र मोतीलाल दोनाडकर आपला शेती व दुधाचा व्यवसाय अजुनही सोडला नाही. ग्रामीण भागाशी त्यांची नाळ अजुनही जोडून आहे. मुलगा नोकरी लागल्याने घरची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे याचे समाधान मोतीलाल दोनाडकर यांना आहे. दोनाडकर यांनी मुलाला शिक्षण देण्यासाठी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे.
..... म्हणून निवडला अभ्यासक्रममोतीलाल दोनाडकर यांच्याकडे पशुधन आहे. जनावरांबाबत त्यांच्या कुटुंबात प्रेम आहे. या प्रेमापोटीच मनोज यांनी पशुवैद्यकीय अभ्यासक्रम केला.
मोतीलाल यांचा संघर्ष पालकांसाठी प्रेरणादायीआजचे शिक्षण अतिशय महाग झाले आहे. तसेच मोठ्या शहरात मुलाला शिकविणे गरीब पालकाला शक्य होत नाही. मात्र, एकरभर जमीन असलेल्या मोतीलाल यांनी मनोजला शिक्षणासाठी काहीच कमी पडू दिले नाही. मनोज शिक्षण घेत असताना आर्थिक संकटाचा सामना दोनाडकर कुटुंबाला करावा लागला. मात्र, त्यावर त्यांनी यशस्वीरीत्या मात केली. मोतीलाल यांनी केलेला संघर्ष इतर पालकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.