Join us
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Success Story : अबब! हळदीने गावाला दिले ५ कोटींचे ‘सोन्याचे’ उत्पन्न वाचा सविस्तर यशकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 16:55 IST

Farmer Success Story : पारंपरिक कापूस–सोयाबीनला फाटा देत एका गावाने हळदीच्या पिकातून थेट ५ कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळवले आहे. एकरी सुमारे २ लाख रुपयांचा निव्वळ नफा, ठिबक सिंचनाचे ८० टक्के अनुदान आणि योग्य व्यवस्थापनामुळे गावातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहे. हळदीने गावाचे नशीब कसे पालटले? वाचा ही प्रेरणादायी यशकथा (Farmer Success Story)

मोहन बोराडे

पारंपरिक कापूस-सोयाबीनच्या चक्रातून बाहेर पडत सेलूपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या सेलू तालुक्यातील निरवाडी बु. या गावाने हळदीच्या माध्यमातून स्वतःचे अर्थकारणच बदलून टाकले आहे.(Farmer Success Story)

आज गावातील प्रत्येक कुटुंबात किमान एक एकर हळद असून, या पिकातून गावाचे वार्षिक उत्पन्न तब्बल ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे.(Farmer Success Story)

पारंपरिक पिकांना फाटा, हळदीकडे मोर्चा

पूर्वी गावात कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी ही पारंपरिक पिके घेतली जात होती. मात्र उत्पादन खर्च वाढत असताना अपेक्षित दर मिळत नव्हते.

पाण्याची उपलब्धता आणि बाजारपेठेचा अभ्यास पाहता शेतकऱ्यांनी हळद या नगदी पिकाची निवड केली आणि इथूनच गावाच्या आर्थिक क्रांतीची सुरुवात झाली. आज गावातील ३७९ हेक्टर लागवड क्षेत्रापैकी सुमारे १२५ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड केली जाते.

एकरी दोन लाखांचा नफा कसा?

हळद पिकासाठी एकरी सरासरी खर्च

बियाणे

लागवड व मशागत

ठिबक सिंचन

काढणी व प्रक्रिया

एकूण खर्च : सुमारे १ रु. लाख

सरासरी उत्पादन : २५ क्विंटल (वाळलेली हळद)

बाजारमूल्य : सुमारे ३ रु. लाख

निव्वळ नफा : एकरी २ रु. लाख

योग्य व्यवस्थापन केल्यास काही शेतकरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन घेत आहेत.

ठिबक सिंचनामुळे शक्य झाली क्रांती

कृषी विभागाच्या माध्यमातून ८० टक्के अनुदानावर ठिबक सिंचन उपलब्ध झाल्याने कमी पाण्यातही हळदीची लागवड शक्य झाली. सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची बचत, खत व्यवस्थापन आणि उत्पादनवाढ या तिन्ही बाबतीत मोठा फायदा झाला.

सहायक कृषी अधिकारी सुहास थोपटे व मंडळ कृषी अधिकारी बलभीम आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीजप्रक्रिया व बायोमिक्स वापरामुळे कंदकुज रोगाचे नियंत्रण कमी खर्चात झाले.

शेतकऱ्यांचे अनुभव

माझ्याकडे २२ एकर शेती असून त्यापैकी ११ एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केली आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पणी बचत होते. एकरी सरासरी ३० क्विंटल हळदीचे उत्पादन मिळते. यातून भरपूर नफा मिळत आहे. - सदाशिव खांडेकर, शेतकरी

दरवर्षी हळद पिकाची ४-५ एकरांवर लागवड करतो. एकरी सरासरी २५ क्विंटल एवढे उत्पादन मिळते. पाच एकरांमधून दहा लाख रुपयांचे उत्पन्न हे इतर कोणत्याही पिकातून मिळत नाही. - बाबासाहेब काळे, शेतकरी

गावाचे बदललेले अर्थकारण

प्रत्येक कुटुंबात १ ते १५ एकर हळद

एकरी सरासरी २ रु. लाख नफा

गावाचे वार्षिक उत्पन्न ५ रु. कोटींपेक्षा जास्त

शेतीतून स्थिर नगदी प्रवाह

हळद पिकाने निरवाडी बु. गावाला केवळ आर्थिक बळच दिले नाही, तर आत्मविश्वासही दिला आहे. पारंपरिक पिकांऐवजी बाजाराभिमुख शेती केल्यास गावाचे अर्थकारण कसे बदलू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

योग्य पाणी व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा वापर, सरकारी अनुदान आणि बाजारपेठेचा अभ्यास या चार घटकांच्या जोरावर निरवाडी बु. गावाने हळदीच्या माध्यमातून सुवर्णयुग अनुभवले आहे. आज या गावात हळद हे फक्त पीक नाही, तर समृद्धीचे प्रतीक बनले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Shetkari Abhyas Daura : राज्यातील शेतीला 'युरोपियन टच'; शेतकरी परदेशात काय शिकणार? वाचा सविस्तर

अधिक वाचा : Farmer Success Story : २० किलो बियाणं… ८५ क्विंटल उत्पादन; कसं शक्य झालं? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Turmeric Farming Transforms Nirwadi Village, Yielding ₹5 Crore Income

Web Summary : Nirwadi village shifted from traditional crops to turmeric, boosting its economy. With efficient water management and government subsidies for drip irrigation, villagers earn ₹5 crore annually, proving market-oriented farming success.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक