Join us
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Success Story: नोकरी सोडली, निसर्ग स्वीकारला; पंजाब राजेंनी सेंद्रिय शेतीत रचली यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 10:16 IST

Farmer Success Story: बेंगळुरूसारख्या महानगरात फॅशन डिझायनर म्हणून यशस्वी करिअर असतानाही पेठवडजच्या पंजाब आनंदराव राजेंनी शहराला रामराम ठोकला. सेंद्रिय शेतीच्या जोरावर त्यांनी आज गावातच समृद्ध आणि शाश्वत भविष्य उभं केलं आहे.

गोविंद शिंदे

बेंगळुरूसारख्या महानगरात फॅशन डिझायनर म्हणून स्थिर नोकरी, गलेलठ्ठ पगार आणि शहरातील सर्व सुखसोयी असतानाही 'मन रमत नाही' या भावनेतून शहराला रामराम ठोकत गावाकडच्या मातीत पुन्हा पाय रोवणाऱ्या पंजाब आनंदराव राजेंची यशोगाथा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. (Farmer Success Story)

पेठवडज (ता. कंधार) येथील पंजाब राजेंनी बदलत्या काळाची पावले ओळखत सेंद्रिय शेतीचा जो यशस्वी प्रयोग उभारला आहे, तो संपूर्ण जिल्ह्यासाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.

शहरात यश, पण मन गावाकडे

पंजाब राजे यांनी शिक्षणानंतर बेंगळुरूमध्ये फॅशन डिझायनर म्हणून करिअरची सुरुवात केली. चांगला पगार, सुरक्षित नोकरी आणि शहरी जीवनशैली मिळूनही त्यांचे मन मात्र गावाकडच्या शेतीत आणि मातीशी जोडलेल्या जीवनात अडकले होते. शेवटी त्यांनी मोठा निर्णय घेत शहरातील झगमगाट सोडून थेट गावाकडे परतण्याचा मार्ग स्वीकारला.

रासायनिक शेतीचा अनुभव आणि प्रश्नचिन्ह

गावाकडे आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपरिक रासायनिक शेती केली. मात्र वाढता उत्पादन खर्च, कीटकनाशकांचा अतिवापर, जमिनीचा कस कमी होणे आणि त्याचा थेट परिणाम कुटुंबाच्या आरोग्यावर होऊ लागला. उत्पादन मिळत होते, पण नफा हातातून निसटत होता. आपण शेती करतोय की हळूहळू शेतीच संपवत आहोत? हा प्रश्न त्यांना सतावत होता.

सेंद्रिय शेतीकडे निर्णायक वळण

२०२४ मध्ये अति प्रभावी मेगा पाणलोट प्रकल्प आणि अश्वमेघ ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था (अमरावती, शाखा कंधार) यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या शेतीचा प्रवास निर्णायक वळणावर आला. 

प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेतीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, शेतभेटी आणि सातत्यपूर्ण सहकार्य मिळाल्याने त्यांनी सेंद्रिय शेतीकडे ठाम पाऊल टाकले.

खर्च घटला, दर्जा वाढला

पाच एकर जमिनीतून तीन एकर क्षेत्रावर त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय शेती सुरू केली. सुरुवातीला उत्पादन कमी येईल, बाजार मिळणार नाही अशी भीती होती; मात्र प्रत्यक्ष अनुभव वेगळाच ठरला. 

गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क यांसारख्या सेंद्रिय निविष्ठा स्वतः तयार केल्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च सुमारे ४० टक्क्यांनी कमी झाला. त्याचबरोबर उत्पादनाचा दर्जा लक्षणीयरीत्या वाढला.

सेंद्रिय पिकांना बाजारात मागणी

सेंद्रिय हळदीच्या लागवडीतून पंजाब राजेंना २० ते २५ टक्के अधिक नफा मिळू लागला असून व्यापारी थेट शेतावर येऊन मालाची पाहणी करतात.

हळदीसोबतच दुधी भोपळा, टोमॅटो, वांगी, कांदा अशा सेंद्रिय भाज्यांना स्थानिक बाजारात आणि थेट ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. सेंद्रिय ऊसापासून तयार होणाऱ्या गुळाला रासायनिक गुळाच्या तुलनेत प्रतिकिलो १५ ते १७ रुपये अधिक दर मिळत आहे.

शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड

केवळ पिकांवर अवलंबून न राहता त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. दूध संकलन व प्रक्रिया युनिट उभारल्यामुळे शेतीला पूरक आणि नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला. त्यामुळे शेतीतील चढ-उतारांचा धोका कमी झाला आहे.

भविष्यासाठी सेंद्रिय शेती

अडीच एकर क्षेत्रात त्यांनी केशर आंब्याची सेंद्रिय लागवड केली असून त्यांच्या शेताला अति प्रभावी मेगा पाणलोट प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाची दखल घेतली आहे.

शहरातील यशस्वी करिअर सोडून सेंद्रिय शेतीतून शाश्वत उत्पन्न, आरोग्य आणि समाधान मिळवणाऱ्या पंजाब राजेंची ही यशोगाथा आज अनेक तरुण आणि शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सेंद्रिय शेती म्हणजे मागे जाणे नाही, तर निरोगी भविष्यासाठी पुढे जाणे आहे. खर्च कमी करून दर्जेदार उत्पादन घेणे ही आज काळाची गरज आहे.- पंजाब आनंदराव राजे, प्रयोगशील शेतकरी

हे ही वाचा सविस्तर :Farmer Success Story : ५० गुंठ्यांत ८५ टन ऊस; मंठ्याच्या शेतकऱ्याने घडवला चमत्कार वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : From Fashion to Farming: Punjab Raje's Organic Success Story

Web Summary : Leaving a fashion career, Punjab Raje embraced organic farming. Facing challenges with chemical farming, he switched to organic methods, reducing costs and improving produce quality. His success with turmeric, vegetables, and jaggery, along with dairy farming, inspires sustainable agriculture.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसेंद्रिय शेतीसेंद्रिय भाज्या