Join us

Farmer Success Story : बीई मेकॅनिकल तरुणाला ऐनवेळी कंपनी विकावी लागली, आता सहा एकरावर यशस्वी फळशेती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:57 IST

Farmer Success Story : मागील दहा वर्षांपासून या फळबागांतून (Fruit farming) त्याला पाच ते सहा लाख रुपये उत्पादन मिळत असते.

- राजू बांते 

भंडारा : उच्च शिक्षित तरुण शेतीकडे वळायला तयार होत नाही. शेती परवडत नाही, म्हणून नोकरीचं बरी, अशी मानसिकता अलीकडे शिक्षित तरुणांची झाली आहे. मात्र, अपवादात्मक काही उच्चशिक्षित तरुण शेतीमध्ये विविध प्रयोग (Experimental Farming) करून लाखो रुपयांच्या नफा कमवित आहेत. त्यापैकी संकेत कुकडकर हे एक तरुण (BE Mechanical Farmer) शेतकरी आहेत. 

वडील माधवराव कुकडकर हे कृषी विभागात अधिकारी (Agri Department) म्हणून नोकरीवर होते. त्यांनी तेरा वर्षांपूर्वी भात पिकाचे शेत मोडून फळबाग शेती (Fruit Farming) करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांना अनेकांनी वेड्यात काढले होते. पण ते, निर्णयावर ठाम होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी त्या फळ शेतीत पूर्णतः पूर्णतः लक्ष घातले. शेतातून उत्पादन येण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

मुलगा संकेत हा बी.ई. (मेकॅनिकल) झाला होता. त्याने नागपूर हिंगणा येथे प्लॅस्टिक ग्रॅन्युल स्वतःची उत्पादन कंपनी सुरू केली, परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला ती कंपनी विकावी लागली. वडील गेल्यानंतर त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. पूर्णतः लक्ष शेतीत घातले. किंबहुना, फळबाग शेतीचे वडिलांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा निर्धार मुलाने केला. वडिलांचे अपूर्ण स्वप्नही पूर्ण केले. 

वडिलांनी सहा एकरांत लावलेले केसर, दशेरी, रत्ना, राजापुरी, लंगडा आंब्याचे वाण, तसेच सरदार, व्ही. एन. आर. पेरू असलेल्या फळ झाडांकडे अधिक लक्ष घातले. त्यांच्या फळबागात आता ६०० आंब्याची, तर दीडशे पेरूची झाडे आहेत. मागील दहा वर्षांपासून या फळबागांतून त्याला पाच ते सहा लाख रुपये उत्पादन मिळत असते.

सहा एकरवर फळबाग शेती बाजारातून तांदूळ व गहू घेण्यापेक्षा संकेत कुकडकर दोन एकरांत परंपरागत गहू व भात शेतीची लागवड सुद्धा करीत असतो. वर्षभर पुरेल एवढे त्याला धान्य शेतीमधून मिळत असते. फळबागात कापूस, चवळी, टोमॅटो आदींचेही आंतरपीक घेतले जाते. यातून त्याला नगदी कमाई मिळत असते.

आंबा आणि पेरू या फळझाडांना दरवर्षीच सारखा मोहर येत नाही. त्यामुळे वार्षिक उत्पादन कमी-जास्त होत असतो. नैसर्गिक आपत्तीवर व निकोप वातावरण यावर उत्पादन अवलंबून असतो. तथापि, शेती आता माझा जीव झाला आहे.- संकेत कुकडकर, शेतकरी, कान्हळगाव

टॅग्स :शेतकरी यशोगाथाफळेशेतीशेती क्षेत्र