Join us

Farmer Success Story : बटाट्याने बदलली मुरंबी गावाची ओळख; ५० शेतकऱ्यांनी साधली दोन कोटींची भरारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:37 IST

Farmer Success Story : लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मुरंबी गावाने बटाटा लागवडीच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाण्याची मर्यादित उपलब्धता असूनही येथील शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करत बटाट्याला आर्थिक समृद्धीचे साधन बनवले आहे. यंदा गावाची उलाढाल तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. (Farmer Success Story)

रामकिशन भंडारे

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मुरंबी हे लहानसं पण प्रयोगशील गाव आता संपूर्ण मराठवाड्यात ओळखले जाऊ लागले आहे. कारण, इथल्या शेतकऱ्यांनी 'बटाटाशेती'तून आपल्या आर्थिक परिस्थितीला नवी दिशा दिली आहे. (Farmer Success Story)

आज मुरंबी गावात बटाटा हे केवळ पीक नसून उलाढालीचा आणि रोजगाराचा स्रोत बनले आहे.तीन महिन्यांच्या या हंगामी पिकाने अनेक शेतकऱ्यांना वर्षभराचा स्थिर नफा आणि नव्या आशा दिल्या आहेत. (Farmer Success Story)

दोन कोटींची उलाढाल; शेतीतून समृद्धीचा मार्ग

मुरंबीतील जवळपास ५० ते ६० शेतकरी दरवर्षी बटाट्याची लागवड करतात. पाण्याची फारशी शाश्वत सुविधा नसतानाही, शेतकऱ्यांनी नियोजन, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर बटाट्याला गावाच्या अर्थव्यवस्थेचा पाया बनवला आहे.

गेल्या हंगामात गावात बटाटा शेतीतून तब्बल १.५ ते २ कोटी रुपयांची उलाढाल झाली. संदीप गंभिरे, शिवाजी मोमले, गोविंद शेळके, अनिल बसपुरे, चंद्रकांत जाधव आणि विठ्ठल इगे या शेतकऱ्यांनी ६ ते ७ एकरांवर बटाटा लागवड करून एकरी दीड ते दोन लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळवले.

या वर्षी अडीचशे एकरांवर बटाटा लागवडीचे नियोजन

या हंगामात मुरंबीसह सुगाव, हिप्पळगाव आणि मोहदळ परिसरात एकूण अडीचशे एकरांवर बटाटा लागवड करण्याचे नियोजन आहे. अतिवृष्टीमुळे काही प्रमाणात लागवड उशिरा झाली असली तरी ५ कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

यंदा चार ते पाच एकर लागवडीचे नियोजन होते, पण पावसामुळे थोडा उशीर झाला. अडीच एकरवर लागवड केली असून उर्वरित बेणे फुटले आहे. काही बेणे नासले तरी उत्पादन चांगले मिळेल.- शिवाजी मोमले, शेतकरी

पंजाबहून मागवतात बेणे

येथील शेतकरी दरवर्षी पंजाबमधील जालंधर येथून बटाटा बेणे (Seed Potato) मागवतात.

यावर्षी बेण्याचा दर २ हजार ५०० ते ४ हजार प्रति क्विंटल इतका आहे.

प्रत्येक एकरासाठी साधारण ८ क्विंटल बेणे लागते आणि उत्पादन १०० ते १५० क्विंटलांपर्यंत मिळते.

ऑक्टोबर महिन्यातील लागवड बटाट्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. या काळातील उष्णता आणि ओलावा बटाट्याच्या वाढीस पोषक ठरतो.- विठ्ठल इगे, व्यापारी

मॉडेल गाव

मुरंबीतील शेतकरी केवळ लागवडच करत नाहीत, तर बेणे निवड, फवारणी, पाणी व्यवस्थापन, आणि विक्री तंत्रज्ञान या सर्व बाबतीत एकमेकांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे गावात सहकार्याची आणि एकत्र प्रगतीची भावना निर्माण झाली आहे.

मुरंबीतील शेतकऱ्यांनी बटाटा शेतीत सातत्य आणि नियोजन दाखवले. त्यांच्या अनुभवावर आधारित माहिती आता शेजारील गावेही स्वीकारत आहेत.- किरण सोमवंशी, कृषी सहायक

अर्थकारण आणि आत्मनिर्भरता

आज मुरंबी गावात बटाटा शेतीमुळे केवळ उत्पन्नच वाढले नाही, तर रोजगाराच्या संधी, वाहतूक, साठवण आणि व्यापारी व्यवहारांचे केंद्र म्हणूनही गाव विकसित झाले आहे. बटाटा शेतीतून मिळालेल्या स्थैर्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नवीन साधनसामग्री, सिंचन सुविधा आणि शिक्षणात गुंतवणूक सुरू केली आहे.

शाश्वत पाणी नसतानाही, योग्य नियोजन आणि प्रयोगशील वृत्ती असेल तर कोणतेही गाव आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकते.

मुरंबीच्या शेतकऱ्यांनी हे सिद्ध केले आहे की, परंपरागत पिकांच्या पलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान आणि मार्केट ओळख वापरल्यास शेतीतूनही कोटींची उलाढाल साध्य होऊ शकते.

हे ही वाचा सविस्तर : Shet Rasta Update : शेतकऱ्यांना दिलासा! शेत-रस्त्यांबाबत सात दिवसांत अंमलबजावणी सक्तीची वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Potato farming boosts Murambi's economy, yielding crores despite water scarcity.

Web Summary : Murambi farmers thrive with potato cultivation, generating significant income despite limited water. Annual turnover exceeds two crores, inspiring nearby villages to adopt the practice. October heat is ideal.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबटाटा