अनिल महाजन
सोयाबीन पिकानंतर कमी कालावधीत नगदी पीक घेत चांगले उत्पन्न मिळवता येते, याचा प्रत्यय धारूर येथील तरुण शेतकरी जयदत्त सर्जेराव शिनगारे यांनी दिला आहे. अवघ्या तीन महिन्यांत एक एकर क्षेत्रातून सुमारे दोन लाख रुपयांचे बटाटा उत्पादन घेऊन त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.(Farmer Success Story)
सोयाबीननंतर बटाट्याचा प्रयोग
सोयाबीन पीक काढल्यानंतर शिनगारे यांनी ४० गुंठे क्षेत्रात 'पोखराज बी' जातीच्या बटाट्याची लागवड केली. यासाठी त्यांनी ८ क्विंटल बियाण्याचा वापर केला.
योग्य मशागत, वेळेवर तणनियंत्रण, फवारणी आणि पाणी व्यवस्थापन यामुळे अवघ्या तीन महिन्यांत पीक काढणीस तयार झाले.
लागवड ते काढणीपर्यंतचा एकूण खर्च सुमारे ६५ हजार रुपये आला. यात बियाणे, मशागत, औषधे, मजुरी आणि काढणीचा खर्च समाविष्ट आहे.
१५० क्विंटल उत्पादनाचा अंदाज
४० गुंठे क्षेत्रातून सुमारे १५० क्विंटल उत्पादन मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उत्पादन समाधानकारक असले तरी सध्या बाजारात बटाट्याचा दर १५ रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरल्याने अपेक्षित नफा मिळत नसल्याची खंत शिनगारे यांनी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी बटाट्याला ३० रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. त्या दराने विक्री झाली असती तर उत्पन्न दुपटीने वाढले असते, असे ते सांगतात.
सध्याच्या दरानुसार उत्पन्नात घट झाली असली तरी कमी कालावधीत नगदी पीक घेण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाजारभाव स्थिर राहणे गरजेचे
सोयाबीन काढल्यानंतर मी ४० गुंठ्यात बटाट्याची लागवड केली. साधारण तीन महिन्यांत पीक तयार झाले. उत्पादन चांगले आहे; मात्र बाजारभाव १५ रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आल्याने अपेक्षित नफा मिळत नाही. दर ३० रुपये असता तर उत्पन्न अधिक चांगले झाले असते.- जयदत्त शिनगारे, शेतकरी
या प्रयोगातून सोयाबीननंतर कमी कालावधीत बटाट्यासारखे नगदी पीक घेता येते, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, उत्पादनाबरोबरच बाजारभाव स्थिर राहणे शेतकऱ्यांसाठी तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
नियोजनबद्ध शेती, योग्य जातीची निवड आणि वेळेवर केलेली मशागत यामुळे कमी कालावधीतही चांगले उत्पादन घेणे शक्य असल्याचे धारूरच्या या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.
Web Summary : A farmer in Dharur earned ₹2 lakh in three months growing potatoes after soybeans. Using Pokhraj seeds, proper management led to a successful harvest, inspiring local farmers despite market price fluctuations.
Web Summary : धारूर के एक किसान ने सोयाबीन के बाद आलू उगाकर तीन महीने में ₹2 लाख कमाए। पोखराज बीज का उपयोग करके, उचित प्रबंधन से सफल फसल हुई, जिससे बाजार मूल्य में उतार-चढ़ाव के बावजूद स्थानीय किसानों को प्रेरणा मिली।