Join us
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Success Story : पपईने रडवलं, कदूने हसवलं; अर्धापूरच्या शेतकऱ्याची ५० गुंठ्यातून लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 10:30 IST

Farmer Success Story : पपईच्या पिकाने मोठं नुकसान केलं… पण त्यांनी हार मानली नाही. अर्धापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने ५० गुंठ्यात कदूची लागवड करून अवघ्या तीन महिन्यांत सव्वा दोन लाखांहून अधिक उत्पन्न मिळवले. हवामानाचा फटका बसल्यानंतरही पीक बदलाचा घेतलेला धाडसी निर्णय त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला. नेमकं काय केलं त्यांनी? वाचा ही प्रेरणादायी यशोगाथा (Farmer Success Story)

गोविंद टेकाळे

शेतीमध्ये कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. मात्र जिद्द, योग्य नियोजन आणि पीक बदलाचा धाडसी निर्णय घेतल्यास नुकसान भरून निघू शकते, हे अर्धापूर तालुक्यातील लहान येथील प्रयोगशील शेतकरी अनिल सदाशिव हरकरी यांनी सिद्ध करून दाखवले आहे.(Farmer Success Story)

पपईला रोगांचा फटका, मोठं नुकसान

हरकरी यांनी मोठ्या अपेक्षेने पपईची लागवड केली होती. परंतु अनियमित हवामान, अतिवृष्टीचा परिणाम आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.

खर्च झालेला, पण उत्पन्न हाती न लागल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले. अनेक शेतकरी अशा वेळी हताश होतात; मात्र हरकरी यांनी खचून न जाता पर्यायाचा विचार केला.

५० गुंठ्यात कदूची लागवड; तीन महिन्यांत तोडणी

पपईचा प्लॉट अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी ५० गुंठे क्षेत्रावर कदू (भोपळा) लागवडीचा निर्णय घेतला. ऑगस्ट महिन्यात लागवड करून योग्य खत व्यवस्थापन, वेळेवर पाणी आणि कीडनियंत्रण याकडे विशेष लक्ष दिले.

नोव्हेंबरपासून काढणीला सुरुवात झाली. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांत सातत्याने उत्पादन मिळाले. स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळाल्याने उत्पन्नात वाढ झाली.

सव्वा दोन लाखांचे उत्पन्न

केवळ ५० गुंठे क्षेत्रातून हरकरी यांनी सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. पपईमधील नुकसान त्यांनी कदूच्या यशस्वी लागवडीतून भरून काढले. कमी कालावधीत, कमी जोखमीच्या पिकातून त्यांनी नफा मिळवला.

एकाच पिकावर अवलंबून राहू नका

शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून न राहता हवामान आणि बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक बदल करणे गरजेचे आहे. संकटात खचून न जाता पर्याय शोधला तर यश नक्की मिळते.- अनिल हरकारी, शेतकरी

इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा

हरकरी यांचा प्रयोग हा परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. हवामानातील बदल आणि बाजारातील चढ-उतार लक्षात घेऊन पीक विविधीकरण केल्यास उत्पन्न टिकवता येते, हे त्यांच्या उदाहरणातून स्पष्ट झाले आहे.

अर्धापूर तालुक्यातील या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे की, योग्य निर्णय आणि मेहनत असेल तर संकटही संधीमध्ये बदलता येते.

हे ही वाचा सविस्तर : Dutch Roses Farmer Success: डच गुलाबाचा सुपर फॉर्म्युला; दुष्काळी मराठवाड्यात तरुण शेतकऱ्याने केली लाखांची कमाई!

English
हिंदी सारांश
Web Title : Papaya Failed, Pumpkin Paid: Farmer Earns Lakhs from 50 Gunthas

Web Summary : Anil Harkari, an innovative farmer, faced papaya crop failure due to disease. Undeterred, he planted pumpkin on 50 gunthas, earning ₹2.25 lakhs in three months. His success inspires farmers to diversify crops and overcome challenges.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती