Join us

Farmer Success Story: 'लंडन रिटर्न' तरुण शेतकऱ्याचा खजुर शेतीत धमाका; थेट ४० लाखांचं उत्पन्न! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 10:26 IST

Date Palm Tree Farming : लंडनमध्ये एमबीए करून मोठ्या पगाराच्या नोकरीच्या संधी टाळत गावाकडे परत येत रमेश घुगे यांनी शेतीत प्रयोगशीलतेचा नवा अध्याय लिहिला आहे. गुजरातहून खजुराची रोपे मागवून सुरू केलेल्या शेतीत आज त्यांना ४० लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे. ही केवळ शेती नव्हे, तर नव्या युगाची ग्रामीण उद्योजकता आहे. (Date Farming)

योगेश मोरे

लंडनमध्ये एमबीए करून मोठ्या पगाराच्या नोकरीच्या संधी टाळत गावाकडे परत येत रमेश घुगे यांनी शेतीत प्रयोगशीलतेचा नवा अध्याय लिहिला आहे. गुजरातहून खजुराची रोपे मागवून सुरू केलेल्या शेतीत आज त्यांना ४० लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे. ही केवळ शेती नव्हे, तर नव्या युगाची ग्रामीण उद्योजकता आहे.(Date Farming)

शेती म्हणजे केवळ नांगरट नव्हे, तर कल्पकता, जिद्द आणि धोरणात्मक विचारांची परीक्षा. हे दाखवून दिलं आहे भरडखेडा गावातील रमेश घुगे यांनी. परदेशी शिक्षण सोडून त्यांनी खजुर शेतीत नवा प्रयोग करत लाखोंचं उत्पन्न मिळवण्याचा मार्ग शोधला आहे.(Date Farming)

भरडखेडा (ता. बदनापूर) येथील रमेश घुगे यांनी आपल्या शेतीतील प्रयोगशीलतेने आज शेकडो तरुणांसाठी नवा आदर्श उभा केला आहे.(Date Farming)

लंडनमध्ये एमबीए शिक्षण पूर्ण करून मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असताना त्यांनी मातृभूमी आणि मातीची साथ निवडली. परदेशातल्या ग्लॅमरपेक्षा गावाकडच्या जमिनीवर पाय रोवून शेतीत नव्या शक्यता शोधण्याचा त्यांनी निर्धार केला आणि त्यातूनच जन्म झाला एका आगळ्या प्रयोगाचा 'खजुर शेतीचा'.(Date Farming)

गुजरातहून ४०० खजुर रोपांची लागवड

रमेश घुगे यांनी पारंपरिक पिकांऐवजी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. त्यांनी गुजरात येथून इराण वंशाच्या खजुराचे ४०० रोपे मागवली आणि ४.५ एकर शेतीत २५x२५ फूट अंतरावर लागवड केली.

एका रोपामागे सुमारे ४ हजार रुपये खर्च आला. तीन वर्षे सेंद्रिय पद्धतीने झाडांची निगा राखली. या काळात आंतरपिक म्हणून सोयाबीनही घेतलं. चौथ्या वर्षी झाडांना फळधारणा सुरू झाली.

उत्पादन आणि अपेक्षित उत्पन्न

या वर्षी एक झाड सुमारे १ ते १.५ क्विंटल खजूर देत आहे. बाजारभाव १५० ते २०० रुपये प्रति किलो असून, एकूण उत्पादन अंदाजे ३० टन होण्याची शक्यता आहे. यावरून ३५ ते ४० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. ही एक अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आकडेवारी आहे.

देशांतर्गत विक्रीपासून ते निर्यातीपर्यंतचा पुढचा टप्पा

रमेश घुगे यांचा पुढचा टप्पा अजून अधिक भव्य आहे. ते खजुराच्या ड्रायफ्रूट प्रक्रियेकडे वाटचाल करत असून, समृद्धी महामार्गाद्वारे देशांतर्गत बाजारपेठेत विक्री आणि पुढे आखाती देशांमध्ये खजुराची निर्यात करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

शेती म्हणजे उद्योग!

शेती ही पारंपरिक मार्गाने न करता व्यावसायिक दृष्टीने केली पाहिजे. त्यात नावीन्य, बाजारपेठेचं भान आणि व्यवस्थापन आवश्यक आहे. शेती म्हणजे उद्योग आहे, आणि तो युवकांनी आत्मसात करावा. - रमेश घुगे, खजुर उत्पादक शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : ३० गुंठ्यातून चार लाखांचे उत्पन्न; कोथिंबिरीच्या शेतीतून युवा शेतकऱ्याची 'आर्थिक क्रांती' वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीजालनाशेतकरी यशोगाथा