Join us

कुटुंब भूमिहीन, शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत, आता दोन हार्वेस्टर मशिन्सचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:05 IST

Success Story :

- रतन लांडगेइच्छाशक्ती आणि अथक परिश्रमाच्या बळावर माणूस नशिबालाही झुकवू शकतो. याचा प्रत्यय वलनी येथील एका शेतमजूर तरुणाच्या यशोगाथेतून येतो. सूरज सोमप्रभू हटवार त्याचं नाव. कसंबसं गावातीलच शाळेत जेमतेम दहावीपर्यंत शिकलेला. अगदी भूमिहीन. अख्ख्या कुटुंबाचं हातावरच पोट. 

आई-वडील मिळेल ते काम करून कुटुंबाचा गाडा हाकणारे. दहावीनंतर शिक्षणात मन रमेना म्हणून तो दुसऱ्यांकडे ट्रॅक्टर ड्रायव्हर नंतर हार्वेस्टर ड्रायव्हर झाला आणि आता हाच शेतमजूर कुटुंबात जन्मलेला ड्रायव्हर मुलगा फाटक्या परिस्थितीतून सुरुवात करून दोन हार्वेस्टर मशिन्सचा मालक बनला आहे. 

त्याचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं. वडिलांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणं कठीण होतं. लहान वयातच त्यालाही मिळेल ते काम करावे लागले, कधी शेतात मजुरी तर कधी इतरांची छोटी-मोठी कामे. 

शेतीची कामे करून करून शेतीच्या समस्या त्याने जवळून अनुभवल्या होत्या. काढणीच्या वेळी मजुरांची कमतरता आणि वेळेवर काम न झाल्यास होणारे नुकसान त्याने पाहिले होते. याच अनुभवातून त्याच्या मनात एक स्वप्न आकारले. 'काढणीची प्रक्रिया सुलभकरण्यासाठी स्वतःचे हार्वेस्टर घ्यायचे.'

इतरांसाठी प्रेरणादायीहे स्वप्न पूर्ण करणं सोपं नव्हतं. हार्वेस्टरची किंमत लाखो रुपये असल्याने भांडवल जमवणे त्याच्यासाठी एक मोठं आव्हान होतं; पण त्याने हार मानली नाही. मिळेल त्या मार्गाने बचत सुरू केली. काही वर्षापूर्वी त्यांनी भागीदारीत एक छोटेसे सेकंडहँड हार्वेस्टर घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. 

वलनीच्या पोरानं स्वतःचे नवीन आधुनिक हार्वेस्टर मशीन घेऊन स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. कधीकाळी ड्रायव्हर म्हणून ओळखला जाणारा हा 'सूरज' आता उद्योग जगताच्या आकाशात मालक म्हणून दिमाखात चमकतोय! वलनीच्या या 'गरीब पोऱ्या'ची कहाणी आज संपूर्ण पंचक्रोशीसाठी आदर्श ठरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Landless Farm Laborer Achieves Success, Now Owns Two Harvesters

Web Summary : Suraj, from a landless family and educated only till 10th grade, overcame adversity through hard work. Starting as a tractor driver, he now owns two harvester machines, an inspiration to his community.
टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेती क्षेत्रशेतकरीकाढणी