Join us

Farmer Success Story : परंपरा मोडून आधुनिकतेकडे: इटकापल्ले बंधूंचा यशस्वी केळीचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 09:30 IST

Farmer Success Story : कंधार तालुक्यातील बारुळ येथील दोन तरुण, वसंत आणि अविनाश इटकापल्ले यांनी पारंपरिक शेतीला मागे टाकून आधुनिक पद्धतीने केळीची लागवड केली आणि आपल्या काटेकोर नियोजनातून थेट परराज्यांतील बाजारपेठा गाठत चंदिगड, हैदराबादसारख्या शहरांमध्ये ‘बारुळ केळीचा गोडवा’ पोहोचवला. (Farmer Success Story)

गोविंद शिंदे

कंधार तालुक्यातील बारुळ येथील दोन तरुण, वसंत आणि अविनाश इटकापल्ले यांनी पारंपरिक शेतीला मागे टाकून आधुनिक पद्धतीने केळीची लागवड केली आणि आपल्या काटेकोर नियोजनातून थेट परराज्यांतील बाजारपेठा गाठत चंदिगड, हैदराबादसारख्या शहरांमध्ये 'बारुळ केळीचा गोडवा' पोहोचवला.(Farmer Success Story)

यशाचा प्रवास

एकेकाळी पारंपरिक ज्वारी, सोयाबीन, कापसावर अवलंबून असलेले इटकापल्ले बंधू आज केळीच्या आधुनिक उत्पादनातून लाखोंचा नफा कमावत आहेत. त्यांनी कृषी सहाय्यक परमेश्वर मोरे आणि गोविंद तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 6 एकर क्षेत्रात केळी लागवड सुरू केली.

लागवडीची तयारी

जून २०२४ मध्ये ७ हजार केळी रोपांची लागवड ६x६ फूट अंतरावर करण्यात आली. बेडवर शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट व निंबोळी पावडरसह सुधारित पद्धतीने खड्डे तयार करून लागवड करण्यात आली. सेंद्रिय औषधींचीही नियमित फवारणी केली गेली.

संरक्षण व पर्यावरणीय नियोजन

जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेताभोवती तार कुंपण आणि गजराज गवताची लागवड केली. त्यामुळे उष्णता व थंडीपासून केळीचे संरक्षण तर झालेच, शिवाय जनावरांसाठी चाऱ्याचीही सोय झाली.

उत्पन्न आणि बाजारपेठेतील यश

आज एका झाडाला सरासरी ३५ किलो वजनाचा घड मिळतो. दर झाडास ४०० रुपये दराने थेट व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात येत आहे. ७ हजार झाडांपासून सुमारे २८ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळवले आहे.

यश इतक्यावरच नाही थांबले

 त्यांच्या 'गोड' केळीला चंदीगड (पंजाब), हैदराबाद (तेलंगणा), नागपूर अशा मोठ्या बाजारपेठांतून मागणी येऊ लागली आहे. शेतातून थेट माल खरेदी करून व्यापारी बारुळहून केळी वाहून नेत आहेत.

अनुदानाचा लाभ

या फळबाग प्रकल्पात त्यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत बागायती क्षेत्रासाठी अनुदानाचा लाभ घेतला असून, प्रति एकर ७५ हजार रुपयांचे अनुदान मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

इटकापल्ले बंधू काय सांगतात

पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता, शाश्वत उत्पादन देणाऱ्या फळपिकांची निवड करून शेतकऱ्यांनी शेतीत नवसंजीवनी आणावी. शेतीसंबंधित मार्गदर्शन घेऊन योग्य नियोजन आणि चिकाटीने कोणतीही अडचण पार करता येते.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : खचला नाही, लढला... अन् केळी पोहोचली थेट इराणच्या बाजारात!

टॅग्स :शेती क्षेत्रकेळीशेतकरीशेती