Farmer Success Story : पाण्याअभावी कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गिरजा नदीवरील कोल्हापुरी बंधारा आशेचा किरण ठरला आहे.(Farmer Success Story)
या बंधाऱ्यामुळे परिसरात पाण्याची उपलब्धता वाढली असून, त्याचा थेट फायदा फळबाग लागवडीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना होत आहे. (Farmer Success Story)
याच संधीचा योग्य उपयोग करत वजीरखेडा येथील तरुण, प्रगतशील शेतकरी अभिषेक फुके यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीची सांगड घालत कोरडवाहू शेतीतून उल्लेखनीय यश मिळवले आहे.
डोक्यावर हंडा, मनात स्वप्न
अभिषेक फुके यांनी पाच वर्षांपूर्वी दोन एकर कोरडवाहू शेतात मोसंबीची फळबाग उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या काळात शेतात कोणतीही सिंचन सुविधा नव्हती. मात्र, हार न मानता त्यांनी डोक्यावर हंडा घेऊन रोपांना पाणी देत मोसंबीच्या झाडांची जोपासना केली.
१५ बाय १३ फूट अंतरावर त्यांनी तब्बल ४५० मोसंबीची रोपे लावली. पुढे कृषी विभागाच्या मदतीने ठिबक सिंचन संच उपलब्ध झाल्यानंतर बागेला नवी दिशा मिळाली.
गिरजा नदीचा बंधारा ठरला टर्निंग पॉईंट
शेताजवळून वाहणाऱ्या गिरजा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याला सध्या नऊ दरवाजे भरून पाणी साठलेले आहे. त्यामुळे मार्चपर्यंत पाण्याची उपलब्धता राहणार असून, याचा मोठा फायदा मोसंबी बागेसह रब्बी पिकांनाही होत आहे. योग्य नियोजनबद्ध पाण्याच्या वापरामुळे बागेची वाढ जोमात झाली आहे.
सेंद्रिय शेतीमुळे खर्चात बचत
अभिषेक फुके यांनी संपूर्ण मोसंबी बाग सेंद्रिय पद्धतीने जोपासली आहे. लिंबोळी अर्क, बायो फर्टिलायझर यांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे रासायनिक खत व कीटकनाशकांवरील खर्चात मोठी बचत झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढण्यास मदत झाली.
झाडांना बांबूचा आधार
यंदा पाण्याची चांगली उपलब्धता असल्याने मोसंबीची बाग भरघोस फळांनी लगडली आहे. फळांचे वजन वाढल्यामुळे झाडे वाकू लागल्याने अभिषेक यांनी बांबूचा आधार देण्याची शास्त्रीय पद्धत अवलंबली आहे. यामुळे फळे जमिनीवर पडत नाहीत आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते.
दहा टन उत्पादन, पाच लाखांचे उत्पन्न
यावर्षी सुमारे दहा टन मोसंबी उत्पादनाची अपेक्षा असून, त्यातून जवळपास पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास अभिषेक फुके यांनी व्यक्त केला आहे.
सुरुवातीच्या टप्प्यातच मोसंबीपासून त्यांना सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या प्रवासात त्यांना आई-वडील आणि भावांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विमा न मिळाल्याची खंत, तरीही आत्मविश्वास कायम
मोसंबी बागेसाठी चार वेळा पीक विमा काढूनही एकदाही विम्याची रक्कम मिळाली नाही, याची खंत अभिषेक व्यक्त करतात.
मात्र, गिरजा नदीवरील बंधाऱ्यामुळे पाणी उपलब्ध झाल्याने कोरडवाहू भागातही फळबाग शेती यशस्वी होऊ शकते, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे.
गिरजा नदीवरील बंधाऱ्यामुळे पाणी मिळाले आणि योग्य नियोजन केले, तर कोरडवाहू भागातही फळबाग शेती फायदेशीर ठरू शकते. - अभिषेक फुके, तरुण शेतकरी, वजीरखेडा
Web Summary : Abhishek Phuke, a young farmer, transformed dryland into a thriving Mosambi orchard using innovative techniques and organic farming, achieving significant yields thanks to local water access.
Web Summary : अभिषेक फुके, एक युवा किसान, ने नवीन तकनीकों और जैविक खेती का उपयोग करके सूखे खेत को एक सफल मौसंबी बाग में बदल दिया, स्थानीय जल पहुंच के कारण महत्वपूर्ण उपज प्राप्त हुई।