Join us

Farmer Success Story : मेहनत आली फळाला; रेताड जमिनीवर फुलले भुईमूग, वाचा यशोगाथा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 17:08 IST

Farmer Success Story : पाच एकर रेताड शेत जमिनीवर भुईमुगाची लागवड (bhuimung Lagvad)  केली. दरवर्षी भरघोस उत्पादन घेऊन नफा कमवित आहेत.

- गोपाल लाजूरकर 

Farmer Success Story : पावसाळ्यात केवळ धानाची शेती (Paddy Farming) न कसता रब्बी व उन्हाळी हंगामातही पिके घेता यावी, या हेतूने शेतात पाण्याची सोय केली. त्यानंतर एकूण शेतीपैकी पाच एकर रेताड शेत जमिनीवर भुईमुगाची लागवड (bhuimung Lagvad)  केली. गत अनेक वर्षांपासून ते वडिलोपार्जित भुईमुगाचे पीक घेत आहेत. याद्वारे त्यांनी जमिनीच्या प्रकारानुसार पीक घेण्याची किमया तर साधलीच. शिवाय दरवर्षी भरघोस उत्पादन घेऊन नफा कमवित आहेत. देवानंद चुडामणी आकरे, असे कढोली येथील प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे.

गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District) पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. या हंगामात शेतकरी धान, कापूस व सोयाबीन तसेच तूर, तीळ आदी पिकांचे उत्पादन घेतात. ही पिके पारंपरिक पद्धतीने घेतली जात असली तरी रब्बी हंगामात जिल्ह्यात देसाईगंज उपविभागात नदीकाठ परिसरातील रेताड भागात भुईमुगाच्या लागवडीचे क्षेत्र ४५० हेक्टरहून अधिक आहे.

कुरखेडा व आरमोरी तालुक्यातील बहुतांश शेतकरी भुईमुगाची लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधत आहेत. याशिवाय कोरची, देसाईगंज व धानोरा तालुक्यातील काही शेतकरी रब्बी हंगामात भुईमुगाची लागवड करून भरघोस उत्पादन घेतात.

हरभरा, मक्यासह उन्हाळी धानाची लागवडकुरखेडा तालुक्यातील कढोली येथील शेतकरी देवानंद आकरे हे एकूण: ३५ एकर शेती कसतात. रब्बी हंगामात पाच एकरवर भुईमूग, अडीच एकरवर हरभरा, अडीच एकरवर मक्याची लागवड केलेली आहे. तसेच, दोन एकरांवर उन्हाळी धानाची रोवणी करण्यासाठी त्यांनी धान पन्हे टाकलेले आहेत. केवळ खरीप हंगामातच नव्हे, तर रब्बीतही ते विविध पिके घेतात. त्यांची शेती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

सप्टेंबरमध्ये पेरणी, फेब्रुवारीत काढणी पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भुईमुगाची पेरणी शेतकरी सरी पद्धतीने करतात. फेब्रुवारी महिन्यांत पिकाची काढणी होते. 

एकरी २० ते २५ पोती उत्पादन लागवडीपासून ते काढणीपर्यंत भुईमुगाची योग्यप्रकारे देखभाल केल्यास एकरी २० ते २५ पोती उत्पादन प्राप्त होऊ शकते, असे शेतकरी देवानंद आकरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, एकरी १० ते १२ हजार रुपये लागवड खर्च येतो. 

ओल्या शेंगा ४० रुपये प्रतिकिलो भुईमुगाच्या ओल्या शेंगा ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो, तर वाळलेल्या शेंगा ७० ते ८० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्या जातात. विशेष म्हणजे, आरमोरी येथील परवानाधारक काही व्यापारी कढोली परिसरात भुईमुगाच्या शेंगा खरेदीसाठी येतात, तर काही व्यापारी गोंदिया जिल्ह्यातूनही शेंगा खरेदी करतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीगडचिरोलीशेतकरी