Join us

Bamboo Business : बांबूपासून विविध वस्तूंचा व्यवसाय, भंडाऱ्यातील गराडे कुटुंबियांच्या चार पिढ्यांना रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 14:56 IST

Bamboo Business : गराडे कुटुंबास वर्षभरात या व्यवसायासाठी जवळपास १५०० ते २००० बांबूची गरज असते. .

Agriculture News : 'कला' मग ती कोणतीही असो, ती व्यक्तीला रोजगाराच्या माध्यमातून जिवंत ठेवते. आजही मूल पारंपरिक व्यवसाय करून हा समाज आपले जीवन जगत आहे. भंडारा जिल्ह्यातील (Bhandara) जेवनाळा या गावातील गराडे कुटुंबीय बांबूपासून सूप, टोपले, वडगे, पड़े, खुराडे, हारे बनविण्याचे कार्य करीत असून या कामातून त्यांच्या तब्बल चार पिढ्यांना पारंपरिक रोजगार प्राप्त झालेला आहे.

एका बांबूपासून (Bamboo Buisness) एका दिवसात एक व्यक्ती जवळपास दोन वडगे (टोपले) तयार करतो. एक वडगा जवळपास १५० रुपयांना विकला जातो. वर्षभर त्यांचे हे काम नियमित सुरू असते. परंतु में महिन्यात लग्न कार्याच्या कालावधीत त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यांच्या या पारंपरिक व्यवसायाने कुटुंबातील सदस्यांच्या रोजगाराचा प्रश्न जरी सुटला असला तरी आज बांबूपासून बनविल्या आणाऱ्या वस्तूंना बाजारपेठेत पर्यायी वस्तु उपलब्ध असून प्लास्टिकचा शिरकाव झाल्याने भविष्यात आपला हा व्यवसाय टिकविण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे, असे गराडे कुटुंबीयांचे मत आहे.

चंद्रभान लहान असताना त्यांना घरीच बांबूपासून वस्तू बनविण्याचे कौशल्य वडिलांकडून प्राप्त झाले. लहानपणीच रोजगार प्राप्त झाला. तेव्हापासून अविरत हे कार्य सुरू आहे. संपूर्ण कुटुंबीय या कामात गुंतलेले आहेत, त्यांच्या दोन मुलांनासुद्धा त्यांनी लहानपणीच या कामाचे कौशल्य दिले आहे. ते सुद्धा हेच काम करतात. त्यांना लागणारा कच्चा माल ते वन विभागाच्या नवेगावबांध आणि दिघोरी या आगारांतून बांबू विकत घेतात. वर्षभरात त्यांना व्यवसायासाठी जवळपास १५०० ते २००० बांबू लागतात. एका बांबूची किंमत जवळपास २५ रुपये असते. 

अशा बनवल्या जातात वस्तू 

बांबूला तलावातील पाण्यात तीन दिवस भिजत टाकून ठेवावे लागते. त्या बांबूपासून कातीच्या साह्याने पाहिजे त्या आकाराच्या पट्ट्या काढल्या जातात, तयार झालेला माल पालांदूर व अड्याळ येथील बाजारात ठोक दराने विकला जातो. लाखनी तालुक्यातील जेवनाळा आहे लहानसे गाव. या गावात चंद्रभान चिमण गराडे हे ६० वर्षे वयाचे गृहस्थ राहतात. शिक्षण पहिलीपर्यंतच, त्यांच्या वडिलांच्या आजोबांपासून त्यांच्या कुटुंबात बुरुड व्यवसाय सुरू आहे. बांबूपासून सुपे, टोपल्या, टोपले, वडगे, पड़े, खुराडे, हारे इत्यादी वस्तू तयार करण्याचे काम जवळपास चार पिढ्यांपासून अविरत सुरू आहे.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रभंडाराकर्मचारी