Join us

Taiwan Peru Farming : प्राध्यापकाची तैवान पेरूची शेती, कमी खर्चात लाखोंचे उत्पादन, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:48 IST

Taiwan Peru Farming : या बागेत आजघडीला लाखोचे उत्पादन होत असून, त्यांनी प्राध्यापक पेशा जपत फळ शेतीत (Fruit Farming) क्रांती केली आहे.

- राजकुमार चुनारकर 

चंद्रपूर : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय सध्या अनेक संकटांमुळे डबघाईस आला आहे. तरी शेतकरी  (Farming) या व्यवसायाकडे दुर्लक्ष करीत नाहीत तर अनेक शेतकरी या व्यवसायात नेहमी वेगवेगळे प्रयोग करीत असतात. असाच प्रयोग चिमूर येथील समाजकार्याचे प्रा. गजानन बन्सोड यांनी केला. चार एकर शेतीत अकरा महिन्यांपूर्वी त्यांनी तैवान पिंक नावाचे (Taiwan Pink Peru) पेरूची बाग फुलविली आहे. या बागेत आजघडीला लाखोचे उत्पादन होत असून, त्यांनी प्राध्यापक पेशा जपत फळ शेतीत क्रांती केली आहे.

चिमूरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभूळघाट येथील रहिवासी असलेले प्रा. गजानन बन्सोड यांची जांभूळघाट येथे चार-पाच एकर शेती आहे. समाजकार्यात डॉक्टर असलेले प्रा. गजानन बन्सोड हे आठवले समाजकार्य महाविद्यालयात सीनियर प्राध्यापक म्हणून नोकरी करतात. मात्र, त्यांना शेतीची आवड असल्याने ते सुटीच्या दिवशी शेतीवर जातात. शेतीसाठी नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करीत असतात. 

पारंपरिक शेतीत पाहिजे तेवढे उत्पन्न होत नाही व शेती व्यवसाय तोट्यात येतो. त्यामुळे प्रा. गजानन बन्सोड यांनी फळ शेती (Fruit Farming) करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी तैवान पिंक नावाचे पेरूचे रोप जळगाव, कलकत्ता येथून आणून आपल्या चार एकर शेतात दहा महिन्यांपूर्वी दोन हजार ५०० रोपांची लागवड केली. अकरा महिन्यांत या पेरुच्या झाडाला चांगलेच पेरू लागले असून, हे पेरू सध्या चिमूर, नागपूर येथील व्यापाऱ्याला विकत देत आहेत. यातून प्रा. बन्सोड यांना एका सिजनमध्ये पंधरा ते वीस लाखांचे उत्पन्न येत आहे. त्यांनी फळ शेतीत केलेली क्रांती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारी ठरत आहे.

५० हजारांत लाखोचे उत्पन्न वाणाची अडीच हजार रोपे लावली. या रोपांसाठी जैविक पद्धतीने मशागत, शेणखत, जैव रसायन, जिवाणू जल, जैविक बुरशीनाशक, जीवामृत आदी जैविक खत व रसायन वापरले. याला फक्त पन्नास हजार खर्च आला आहे. यातून त्यांना एका सिजनमध्ये पंधरा ते वीस लाखांचे उत्पन्न येत आहे. तर हे उत्पन्न बारा वर्षापर्यंत येत राहणार आहे. आजघडीला एका झाडाला ८० ते ८५ पेरू लागले आहेत. या झाडाला वर्षातून दोनदा बहर येत असून, एका वर्षात दोनदा पेरूचे पीक येणार आहे.

काही वर्षांअगोदर याच शेतीत येलोविरा, शतावरी या वनौषधींची लागवड केली. यातूनही चांगले उत्पन्न आले. मात्र विक्रीसाठी अडचण व उधारीमुळे ते पीक बदलविले असून, आता याच शेतीत तैवान पिंक पेरूची लागवड केली असून यातून उत्पन्न यायला सुरुवात झाली आहे. - प्रा. डॉ. गजानन बन्सोड, चिमूर 

Farmer Success Story : दहा शेतकऱ्यांनी सुरू केली कंपनी; उलाढाल ४० लाखांवर, वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीचंद्रपूरफळे