Join us

Success Story : येवल्याच्या बी.ई. मेकॅनिक तरुणाने नोकरी सोडली, उभारला दूध प्रक्रिया उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 14:07 IST

Success Story : शेतकऱ्याच्या मुलाने अर्थात ऋषिकेश राजेंद्र जाधव या तरुणाने खासगी नोकरी सोडत गावीच दूध प्रक्रिया उभारला आहे.

भाऊराव वाळके

नाशिक : दुष्काळ येवल्याच्या पाचवीला पूजलेला, त्यात तीन एकर कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने अर्थात ऋषिकेश राजेंद्र जाधव या तरुणाने खासगी नोकरी सोडत गावीच दूध प्रक्रिया उद्योग उभारला आहे. ऋषिकेशला कृषी विभागाकडून (Agri Department) मार्गदर्शन मिळाल्यानंतर आता दूध प्रक्रिया उद्योगातून (Milk Processing) चांगलं उत्पन्न मिळत आहे. दर्जेदार उत्पादनामुळे दूध प्रक्रिया उद्योगात त्यांची वेगळी ओळख तयार झाली आहे.

बी. ई. (मेकॅनिक) पदवी कष्टाने मिळवली व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी एका खासगी कंपनीत नोकरी पत्करली. मात्र, कुटुंबापासून लांब, तुटपुंजा पगार व काहीतरी करून दाखवण्याची मनात असलेली उर्मी यामुळे नोकरीला रामराम ठोकून ऋषिकेश आपल्या गावी अंदरसुलला परतला व शेती करू लागला. मात्र, बेभरवशाच्या शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध संकलन करून कुटुंबाला हातभार लावू लागला. त्याची धडपड व उमेद पाहून कृषी सहायक संतोष गोसावी व कृषी पर्यवेक्षक विठ्ठल सोनवणे यांनी पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी कृषी विभागाच्या योजनेत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले व त्यातून उभा राहिला दुग्ध प्रक्रिया उद्योग.

खाद्यपदार्थांची निर्मिती सुरू

ऋषिकेशने स्टीम बॉयलर पद्धतीचा दुग्ध प्रक्रिया प्रकल्प उभारून खवा, तूप, पनीर, लस्सी, पेढा, श्रीखंड व आम्रखंड आदी खाद्यपदार्थांची निर्मिती सुरू केली. लग्नसराईत परिसरातून चांगली मागणी येऊ लागली. त्यासोबतच अंदरसुलला नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विक्री केंद्र सुरू केले आणि धंद्याची भरभराट सुरू झाली. स्वतः सुशिक्षित बेरोजगाराने उद्योग उभारून दोन-तीन मजुरांना काम उपलब्ध करून दिले. त्यांना उद्योग उभारणीसाठी एचडीएफसी बँकेने १३ लाख रुपये कर्ज दिले, तर कृषी विभागाच्या ५.८३ लाख रुपये अनुदानास पात्र ठरले. आता शेती हा दुय्यम धंदा झाला असून, दुग्ध प्रक्रिया उद्योग हाच मुख्य धंदा झाला आहे.

सुशिक्षित व उद्योग उभारू इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजना वरदान ठरत आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी योजनेत सहभागी होऊन रोजगार निर्मितीसह विकास साधावा. त्यासाठी कृषी विभाग सदैव आपल्या सोबत आहे.

हितेंद्र पगार, मंडल कृषी अधिकारी, अंदरसुल

टॅग्स :नाशिकदूधदूध पुरवठाशेतीशेती क्षेत्र